उत्तर भारतीयांचा छठपूजा हा धार्मिक उत्सव ३० आणि ३१ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. छठपूजेनिमित्त अंबाझरी व फुटाळा येथे महापालिकेच्यावतीने सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यांनी दोन्ही तलावाच्या ठिकाणी व्यवस्थेचा आढावा घेत सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
हेही वाचा- यंदा नागपूर गारठणार!; २४ तासांत तापमानात ०.४ अंश सेल्सिअसने घट
छठपूजेसाठी अंबाझरी आणि फुटाळा तलाव येथे मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येत असतात. भाविकांसाठी दरवर्षी नागपूर महापालिकेच्या वतीने सोयीसुविधा पुरवण्यात येतात व सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यात येते. तलाव परिसरात कठडे उभारण्यात आले असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त राहणार आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने येथून भाविक सूर्यदेवतेला अर्ध्य देतात. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये याची काळजी महापालिकेच्यावतीने घेतली जाते.
तलाव परिसरात वाढलेले गवत कापण्यात यावे, तलाव परिसरात जागोजागी कठडे लावण्यात यावे, विद्युत व्यवस्था करण्यात यावी तसेच ध्वनिक्षेपकांची व्यवस्था करावी, असे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच भाविकांना सोयीचे व्हावे यासाठी तलावापर्यंत येण्यासाठी सुरक्षित रस्ता तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच फुटाळा तलावावरही भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. यावेळी माजी महापौर दयाशंकर तिवारी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, संजय पांडे, सुरेंद्र पांडे, सत्येंद्र प्रसाद सिंग, विजय तिवारी, ब्रजभूषण शुक्ला उपस्थित होते.