नागपूर : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिवसाचे १२ असोत की रात्रीचे १२  असाेत,  नेते- कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. कारण,   प्रत्येकालाच येत्या २३  नाेव्हेंबरला   ऐकमेकांचे १२ वाजवायचे आहेत. यासाठी भाषणांसोबतच व्यंगाचा, उपरोेधाचाही आधार घेतला जात आहे.  या  पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ नवा आधुनिक अभिमन्यू हा महाविकास आघाडीवर टीका करणारा व्हिडीयो सध्या गाजत आहे. त्याला  जोरदार प्रत्युत्तर देणारा ‘हयांना जाऊ द्या ना घरी.. आता वाजले की बारा….’ या नटरंग चित्रपटातील गाण्यावर आधारित महायुतीच्या नेत्यावर टीका करणारा एक व्हिडीयोही समाज माध्यमावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर गाण्याच्या माध्यमातून उपरोधाचे बाण चालवण्यात आले आहेत.

नटरंग या चित्रपटातील जाऊ द्या ना घरी या गीताने साऱ्या महाराष्ट्राला वेडे करुन टाकले होते. याच गीताचा उपयोग करुन महायुतीवर व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.आले अधोगती राज्य, काही नाही सुरळीत, तडफड जनतेची काही थांबेना.. उरफट कारभार, जीव झाला हा बाजार, धडपड जगण्याची काही सोसेना . लावली ही वाट कोणी… घाण सगळी केली, राज्याची ही पूर्ती दैना झाली..एक टरबूज आला, त्याला मिंधे भेटला… त्यांनी राज्य नेले रसातळाला…. हयांना जाऊ द्या ना घरी,.. त्यांचे वाजले की बारा….असे या गाण्याचे बोल आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वेगवेगळ्या प्रसंगाचे छायाचित्र असून त्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे. याशिवाय राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या, महागाई, बेरोजगारी, सरकारच्या नव्या योजना आदींकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

हेही वाचा >>>सायबर गुन्हेगारांकडून खरेदीसाठी आमिष दाखवून फसवणूक

राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती उमेदवार निश्चित केले जात असताना अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने ताशांच्या निनादात निघत असलेल्या मिरवणुकीत महायुतीवर टीका करणारे हे गीत वाजविले जात आहे. शिवाय  हा व्हिडीओ समाज माध्यमावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओची जनमानसात चांगलीच चर्चा आहे.  येणाऱ्या दिवसात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जाहीर सभांमधून टीका टीपणी होणार आहे. मात्र त्यात हा व्हिडीओ जास्त वरचढ  होेण्याची  शक्यता आहे.