चीनच्या अनुकरणाचे सरसंघचालक भागवत यांचे आवाहन
नागपूर : औषध कंपन्या आणि संशोधन संस्थांनी भारतीय पुरातन औषधशास्त्राचा अभ्यास करून नव्या औषधांची निर्मिती करावी. यामध्ये चीनने केलेले काम मोठे आहे. त्याचे अनुकरण करायला हवे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरात सोमवारी आयोजित आदर्श इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीच्या उद्घाटन सोहळय़ात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. या वेळी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोन्टू कुमार पटेल, गंगाधर नाकाडे उपस्थित होते.
सरसंघचालक पुढे म्हणाले, औषधनिर्मितीत प्राचीन काळापासून भारताने आपली छाप पाडली आहे. पूर्वी कुठल्या आजारावर कुठली औषधे द्यावी याचे ज्ञान घराघरांत होते. आजही ते काही प्रमाणात आहे. अंगणात औषधी वनस्पती लावण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्यामुळे मंत्रांनी आजार बरे होतात ही गोष्ट सोडली तरी भारतीय औषधशास्त्राचा इतिहास विसरून चालणार नाही. ते मुळापासूनच स्वीकारावे असे नाही. परंतु औषधनिर्मिती कंपन्या आणि संशोधन संस्थांनी नव्या औषधांची निर्मिती करताना भारतीय औषधशास्त्र अभ्यासावे.
औषध आता व्यापाराची गोष्ट
शिक्षण, उद्योग आणि व्यापार करावाच लागणार. औषध ही आता व्यापाराची गोष्ट झाली आहे. त्याचे फायदेही आहेत. करोनाकाळात भारताने जगाला औषधे आणि लस पुरवली. अमेरिका किंवा इंग्लंडने हे केले नाही. ही परोपकाराची मानसिकता शिक्षणातून मिळायला हवी, अशी अपेक्षाही डॉ. भागवत यांनी व्यक्त केली.
‘अॅलोपॅथी’ने आजार मुळापासून बरा होत नाही
आताचे औषधशास्त्र हे रसायनशास्त्राकडे झुकणारे आहे. त्यातही आपले परंपरागत ज्ञान आहे. मात्र, साधारण प्रवृत्ती अशी आहे की, जे राजमार्गाने आले नाही किंवा व्यवस्थेत बसले नाही त्याला नाकारायचे. कावीळ रोगावर आजही अॅलोपॅथीमध्ये पूर्ण उपचार नाहीत. ‘अॅलोपॅथी’मध्ये आजार मुळापासून बरा करणारा उपाय नाही, असे डॉ. भागवत म्हणाले.
‘चायनीज मेडिसिन’ची प्रशंसा
औषधशास्त्र शिकताना आपल्या परंपरागत ज्ञानाची त्यात भर टाकता येते. अनेक देशांनी हे केले आहे. आपल्या शेजारच्या चीननेही हेच केले. त्याने आपली व्यवस्था आपल्या परंपरेच्या आधारावर उभी केली. परंपरागत आणि आधुनिक शास्त्राचा मेळ घातला. त्यामुळे आज ‘चायनीज मेडिसिन’ सर्वत्र प्रचलित आहेत. भारतीय कंपन्यांनीही परंपरेने आलेल्या गोष्टींचा अभ्यास करावा, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले.