गोंदिया : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदांसाठी निवडणूक नुकतीच पार पडली. संचालकपदांच्या निवडणुकीनंतरही सभापती व उपसभापती पदांसाठी निवडणूक होणार असून, आपल्याच पक्षाचा सभापती व उपसभापती असावा, यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये संचालकांची १८ पदे आहेत. यापैकी देवरी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपा समर्थित पॅनेलचे सर्व १८ उमेदवार अविरोध निवडून आले. उर्वरित १२६ संचालकपदांसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यात गोंदिया बाजार समितीमध्ये आ. विनोद अग्रवाल यांची चाबी संघटना व काँग्रेस समर्थित पॅनेलने बहुमत प्राप्त केले. त्यामुळे येथे सभापतीपद चाबी संघटनेला व उपसभापतीपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. आमगाव येथे भाजपा-राकाँ समर्थित पॅनेलने बहुमत प्राप्त केले असून, येथे भाजपाचे माजी आमदार केशवराव मानकर यांचे सभापतीपद निश्चित मानले जात असून उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा केला जात आहे.
हेही वाचा – वर्धा : इतर शालेय खेळाडूंना सवलतीचे गुण मिळणार; क्रिकेटपटू मात्र वंचित
गोरेगाव येथे १८ पैकी १२ जागांवर भाजपा समर्थित उमेदवार निवडून आल्याने येथे सभापती व उपसभापतीपद भाजपा उमेदवाराला मिळणार आहे. सडक अर्जुनी येथे भाजपा समर्थित पॅनेलचे ८ व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित ९ संचालक निवडून आले असून एक संचालक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा निवडून आला आहे. त्यामुळे सभापती, उपसभापतीपदासाठी येथे चुरस पाहायला मिळणार. अर्जुनी मोरगाव येथे भाजपा व महाविकास आघाडी समर्थित पॅनेलचे प्रत्येकी ९ संचालक निवडून आल्याने येथे सभापती व उपसभापतीपदाची निवडणूकही रंगतदार होणार आहे. त्यामुळे प्रत्येक बाजार समितीमध्ये आपल्याच पक्षाचा सभापती व उपसभापती व्हावा, यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. तर इच्छुक संचालकांनी पक्षातील वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांकडे पायपीट सुरू केली आहे. युतीत जिथे राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक आहे तिथं दावा केला आहे. भाजपामध्ये मात्र वरिष्ठांची मनधरणी, लॉबिंग सुरू असल्याचे चित्र आहे.