नागपूर : अभिनेत्री रश्मिका मंदाना एका लिफ्टमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चांचे वादळ उठले आहे. हा व्हिडीओ मुळात बनावट असून तो अभिनेत्री मंदानाचा ‘डीपफेक’ व्हिडीओ आहे. मूळ व्हिडीओमध्ये ब्रिटिश भारतीय मुलगी ‘झारा पटेल’ ही आहे. झारा पटेल हीच्या मूळ चेहऱ्याऐवजी रश्मिका मंदानाचा चेहरा मॉर्फ करून लावण्यात आल्याने ‘डीपफेक’ हा अधिक चिंतेचा विषय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक ज्येष्ठ अभिनेत्यांनीही या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस होते. कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) वापरून तयार केलेले ‘डीपफेक’ हा प्रकार केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्यालाच नव्हे, तर लोकशाही व समाजापुढे निर्माण झालेला मोठा धोका आहे, असे सांगतानाच, नव्या पिढीने या तंत्रज्ञानाचा समाजाच्या भल्याकरीता उपयोग केला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येथे केले.
हेही वाचा – गोंदिया : दिवाळीत एसटीने कमाविले १३ कोटी; महामंडळावर लक्ष्मी प्रसन्न
नवी पिढी तंत्रज्ञानस्नेही आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा कुशलतेने उपयोग करते. तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि सदुपयोगही करता येतो. नव्या पिढीने तंत्रज्ञानाचा सदुपयोग करावा असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. माजी विद्यार्थी आपल्या मूळ संस्थेशी भावनात्मकदृष्ट्या जुळलेले असतात. हे लक्षात घेता शैक्षणिक संस्थांनीही संस्थेची प्रगती आणि भरभराटीसाठी त्यांचे सहकार्य घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी विपरित परिस्थितीत न डगमगता ज्ञान आणि आत्मबळावर सामना करावा. औपचारिक डिग्रीनंतरही विद्यार्थ्यांनी शिकत राहिले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा – ओबीसी नेते डॉ. तायवाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल अन सुरक्षेत वाढही
कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे स्वागतपर प्रास्ताविक झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाले असून हे वर्ष शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या हिवाळी २०२२ व उन्हाळी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या विविध विद्याशाखेतील परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करणे हेच भविष्य असल्याचे सांगितले. नवनवीन आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकेल अशी गुणात्मक मानव संसाधन निर्मिती हे विद्यापीठासमाेरचे मोठे आव्हान आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.