नागपूर: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली तसेच काही लोकांच्या भेटीही घेतल्या. बुधवारी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला त्या उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी कोराडी येथे जगदंबा मंदिरात देवीचे दर्शन घेतले व त्यानंतर भारतीय विद्या भवन्सच्या सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन केले.
यावेळी त्यांनी उस्थितांना मार्गदर्शन करताना, भगवान श्रीराम यांचे संघर्षमय व गतिमान जीवन संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे, असे सांगितले. शिवाय श्रीरामांच्या जीवनापासून सर्वांनी आदर्श घ्यावा असे आव्हानही त्यांनी केले.
हेही वाचा… नागपूर: युवक धावत्या रेल्वेतून पडला; जवानासह फलाटावरील लोकांच्या तात्परतेमुळे वाचला
राष्ट्रपती व राज्यपाल बैस या दोघांनीही रामायण व भगवान रामाच्या आयुष्यावर यावेळी भाष्य केले. रामाच्या जीवनमूल्यांमधील दृढता ही मानवतेसाठी अनुकरणीय आहे व सर्वासाठी प्रेरणादायी आहे. रामाच्या जीवनातून आदर्श घेण्याची आवश्यकता आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. यावेळी त्यांनी संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी सुरू असलेल्या कार्यासाठी अभिनंदन केले.