वर्धा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सहा जुलैचा नियोजित दौरा रद्द झाला आहे. वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी त्या प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार होत्या. तसेच सेवाग्राम आश्रमाला भेट देणार होत्या. दौरा वेळेवर रद्द झाल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे.

विद्यापीठातील वादाने हा दौरा रद्द झाल्याची चर्चा होत आहे. कुलगुरू प्रा. रजनीश कुमार म्हणाले की, काल सायंकाळी राष्ट्रपतींच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने दौरा रद्द झाल्याचे अवगत केले. येणे सोयिस्कर ठरत (फिलिंग अनकंव्हीनियंट) नसल्याचे मत कळविण्यात आले. कोणताही वाद आमच्या पातळीवर नाही. तसेही काही बाबतीत घोळ होताच. सेवाग्राम दौरा ठरला, मग रद्द झाला व परत ठरला. तसेच राष्ट्रपतींच्या भोजन स्थळाचेही झाले. नागपूर विमानतळावर त्या भोजन घेणार असल्याचे कळले. अन्य काही बाबी असतील तर त्याबाबत सांगता येणार नसल्याचे कुलगुरू म्हणाले.

हेही वाचा – पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाला? काळजी करू नका, ‘या’ विविध मार्गाने करा तक्रार

अन्य एका विद्यापीठ अधिकाऱ्याने वेळेवरच्या तक्रारीवर मान्यवरांचे दौरे रद्द होत नसल्याचे स्पष्ट केले. निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे म्हणाल्या की, दौरा रद्द झाल्याची बाब विद्यापीठाकडूनच कळली. सर्वच कार्यक्रम रद्द झाले अथवा नाही, हे आता सांगू शकत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

Story img Loader