लोकसत्ता टीम
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११व्या दीक्षांत समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ व २ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर भेटीवर येत आहेत.
शुक्रवार, १ डिसेंबर रोजी राष्ट्रपती यांचे पुणे येथून सकाळी १२.१० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन होणार आहे. त्या दुपारी ४.०० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहतील.
शनिवार २ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १११ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती उपस्थित राहतील. यानंतर सकाळी ११.४५ वाजता दिल्लीला जातील.
राष्ट्रपतींची जगन्नाथ मंदिर भेट रद्द
एक डिसेंबरपासून दोन दिवस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूर दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी दुपारी ३.१० वाजता त्या कुकडे लेआउटमधील जगन्नाथ मंदिराला भेट देणार होत्या. मात्र ही भेट रद्द करण्यात आली. राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या राष्ट्रपतींच्या दौऱ्यात या कार्यक्रमाचा समावेश नाही.