नागपूर : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पदके घोषित केली. त्यात नागपूर शहर पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक अमितकुमार पांडे, पोलीस उपनिरीक अक्षयकुमार शुक्ला, उपनिरीक्षक गजानन तांदूळकर आणि राजेश पैदलवार ही पदक प्राप्त अधिकाऱ्यांची नावे आहेत.
राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक अक्षय शुक्ला ३० वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांना उल्लेखनीय कमागिरीबद्दल १०५ रिवॉर्ड्स मिळाले आहे. १९९६ मध्ये दरोड्यासाठी आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांना शुक्ला यांनी झडप घालून पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून ४ पिस्तूल, काडतूस आणि दोन तलवारी जप्त केल्या होत्या. २०१३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. सध्या ते विशेष शाखेत पोलीस उपनिरीक्षक आहेत. मेट्रो रेल्वे बांधकामामुळे होणारा वाहतूक खोळंबा दूर करण्यासाठी केलेल्या उत्तम नियोजनात शुक्ला यांचे महत्वाचे योगदान होते. या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
हेही वाचा – स्वातंत्र्यदिनी आत्मदहन! गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचा इशारा
राजेश पैदलवार हे गुन्हे शाखेत कार्यरत असून मकोका, तडीपार, कारागृहात स्थानबद्दतेचे (एमपीडीए) प्रस्ताव तयार करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आतापर्यंत त्यांनी एपीडीए विभागात २० वर्षे सेवा दिली आहे. त्यांना ७०० पेक्षा जास्त रिवॉर्डस आहे. त्यांनी एमपीडीएचे ६०० तर मकोकाचे ७३ प्रस्ताव तयार केले. त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
नागपूर पोलीस दलात पोलीस निरीक्षक असलेले अमित कुमार पांडे यांनी नक्षलवादी कारवाया रोकण्यासाठी खबऱ्यांचे जाळे निर्माण करून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांना आतापर्यंत २५५ रिवॉर्डस मिळाले. त्यांना यापूर्वी आंतरिक सुरक्षापदक, महासंचालक पदक, विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा – अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याला तिरंगी साज; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला…
गजानन तांदूळकर हे पोलीस उपनिरीक्षक असून त्यांनी एमपीडीए सेलमध्ये कार्यरत असताना ११९ प्रस्ताव तयार केले होते. त्यांना यापूर्वी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
आयबीचे खांडेकर सन्मानित
मूळचे नागपूरकर व सध्या केंद्रीय गुप्तचर विभागात राजकोट (गुजरात) कार्यालयाचे सहाय्यक संचालक बलवंत खांडेकर यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले. ‘आयबी’च्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमधील कार्यालयांमध्ये ते २४ वर्षांपासून कार्यरत आहेत. सेवेतील उत्तम कामगिरीबद्दल त्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.