नागपूर: वाडी परिसरातील एका चार वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करून तिची हत्या करण्याच्या प्रकारणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. शिक्षा रद्द व्हावी म्हणून त्याने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपतीनी फेटाळला. आता आरोपीने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
२००८ साली वाडी परिसरात ही पाशवी घटना घडली होती. अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी वसंत दुपारेला २०१२ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही २०१४ साली ही फाशीची शिक्षा कायम ठेवली. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी फाशीची शिक्षा कायम ठेवली.
हेही वाचा… ‘मेटलाॅक’ काटोलमध्ये उद्योग उभारणार; १६ कोटींची गुंतवणूक
आरोपीच्यावतीने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करण्यात आली. अशा विकृत घटनांवर आळा बसविण्यासाठी फाशीची शिक्षाच योग्य असलाचा निर्वाळा देत २०१७ मध्ये पुर्नविचार याचिकाही फेटाळण्यात आली. यानंतर प्रकरण राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले. २०२३ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दया याचिका फेटाळली. आता आरोपीने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. आरोपी वसंत सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे.