यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याकरीता संचालकांनी चालविलेल्या मोहिमेस अखेर यश आले. मात्र सहकारी संचालकांनी अविश्वास आणण्यापूर्वीच बँकचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी मंगळवारी अध्यक्षपदाचा राजीनामा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सुपूर्द केला. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून बँकेत चाललेल्या अविश्वास नाट्यावर अखेर पडदा पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे हे चंद्रपूर-वणीचे खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांचे समर्थक त्यांच्याच शिष्टाईमुळे अडीच वर्षांपूर्वी कोंगरे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यावेळी राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकाराच फॉर्म्युला जिल्हा बँकेच्या सत्तेतही वापरण्यात आला. वर्षभरापूर्वी राज्यात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले तेव्हापासून जिल्हा बँकेतही सत्ताबदल होणार अशी चर्चा सुरू होती. अलिकडेच खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले. त्यानंतर मात्र कोंगरे यांना अध्यक्षपदाहून खाली खेचण्यासाठी काँग्रेसमध्येच मोहीम सुरू झाली.

हेही वाचा – मंजुरी २४ वर्षांपूर्वी, प्रत्यक्ष काम आता सुरू; नागपूरच्या रस्त्यांची कहानी

कोंगरे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी काँग्रेसमधील एक गट आग्रही होता. यासाठी त्यांनी काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र अध्यक्षपदाचा राजीनामा न देण्यावर टिकाराम कोंगरे ठाम होते. त्यांनी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. पटोले यांनीही राजीनामा न देण्याची सूचना केली होती. त्यानंतर कोंगरे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या भेटीही घेतल्या. मात्र तेथे त्यांना कोणाकडून फार दिलासा मिळाला नाही. दिल्ली दौऱ्यानंतरही कोंगरे राजीनामा न देण्यावर ठाम राहिले. त्यामुळे काँग्रेसच्याच संचालकांनी इतर सर्व संचालकांना विश्वासात घेऊन कोंगरेंवर अविश्वास प्रस्तावाची तयारी सुरू केली होती. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच बँकेच्या संचालकांची बैठकही झाली. या ठिकाणी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने असलेल्या संचालकांची पत्रावर स्वाक्षरी घेण्यात आली. त्यात २१ पैकी १५ संचालकांनी अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याने कोंगरे यांची बाजू कमकुवत झाली होती.

कोंगरे यांनी राजीनामा न दिल्यास संचालकांनी प्लॅन बी तयार ठेवला होता. मंगळवारी दुपारी अविश्वास पत्रावरील स्वाक्षरी पडताळणीसाठी संचालक उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निघाले होते. दुसरीकडे काही संचालकांनी बँकेत कोंगरे यांची भेट घेत चर्चा केली. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यास तो पारित होणार, हे कळून चुकल्यानंतर अखेर अविश्वास दाखल होण्यापूर्वीच टिकाराम कोंगरे यांनी मंगळवारी दुपारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकूंद मिरगे यांच्याकडे अध्यक्षपदाचा राजीनामा सोपविला. तो बँकेकडून मंजुरीसाठी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता विभागीय सहनिबंधक अध्यक्ष निवडीसाठी कधी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सध्या अध्यक्षपदाचा प्रभार बँकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर यांच्याकडे सोपविण्यात आला असून, नवीन अध्यक्ष कोण होणार आणि आता राज्यातील युतीचा फॉर्म्युला वापरणार की, पुन्हा महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – पूर्व विदर्भात हिवतापाचे सात बळी, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा

‘सत्यमेव जयते’ म्हणत राजीनामा

मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांची बँक आहे. आपल्याकडे दोन वर्षे सात महिने अध्यक्षपद होते. या काळात शेतकरी हिताला प्राधान्य दिले. यावर्षी शेतकऱ्यांना ७०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले. गेल्या दोन वर्षांत बँकेचे उत्पन्न वाढले. शासनाकडे व्याजाचे पैसे थकीत होते. पाठपुरावा करून ११ कोटी रुपये मिळविता आले. आणखी सोळा कोटी रुपये लवकरच मिळणार असल्याची माहिती कोंगरे यांनी दिली. अध्यक्षपदाचा राजीनामा का देत आहात, या प्रश्नावर त्यांनी अखेरपर्यंत भाष्य टाळले. ‘सत्यमेव जयते म्हणत’ आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहो, इतकेच टिकाराम कोंगरे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President tikaram kongre resigned before the mistrust in yavatmal district central bank nrp 78 ssb