भंडारा : चाईल्ड लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर दुपारच्या सुमारास एक गोपनीय कॉल आला. सायंकाळी ७ वाजता मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गावात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विवाहाचा घाट घातला जात आहे. हा बालविवाह रोखण्यात यावा. आलेल्या कॉलची पडताळणी करून माहिती खरी असल्याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर विवाहस्थळी पोहोचून बालविवाह रोखण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास विभाग भंडारा व चाईल्ड लाईन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पवयीन मुलीचे गाव गाठत बाल विवाह मोडून काढल्याचा प्रकार घडला आहे.
मोहाडी तालुक्यातील एका गावात एका १४ वर्षीय मुलीचे परराज्यातील १९ वर्षीय मुलासोबत लग्न लावण्याचा घाट घातला जात होता. गावात आणि नातेवाईकांना लग्नाचे निमंत्रण गेले, सायंकाळचा मुहूर्त असल्याने लग्नघरी सकाळपासूनच लगबग सुरू होती, जेवण बनवणे सुरू होते, लगीन घटिका जवळ आली, नवरदेव गावात येऊन पोहोचला. लग्न मंडपात अगदी वेळेवर पोहोचून जिल्हा महिला व बाल विकास विभाग भंडारा व चाईल्ड लाईनच्या अधिकाऱ्यांनी वधूपक्षाला बालविवाह कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी यांचे पत्र दाखवून असे केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे सांगून मुलीच्या कुटुंबीयांची समजूत घातली.
हेही वाचा >>> मोफत रुद्राक्ष वाटपाच्या परमार्थात प्रसिद्धीचा स्वार्थ! खामगावचे धन कुबेर मंदिर चर्चेत
मुळात हे लग्न भटके विमुक्त जमातीतील असल्याने त्यांच्यात बालविवाहाची पूर्वापार प्रथा आहे. अशिक्षितपणामुळे आपण काही चुकीचे करीत आहोत याची जाणीवही या लोकांना नव्हती. यावेळी बाल सरक्षण अधिकारी नितीन साठवणे, सविता सोनकुसरे, डिंपल बडवाईक, शिल्पा वंजारी, निलज बेंदवार चाईल्ड लाईन समन्वय लोकप्रिया देशभ्रतार, समुदेशक वैशाली सतदेवें, टीम सदस्य त्रिवेणी गढपायले, स्वयंसेवक अक्षय खोब्रागडे आणि आंधळगाव पोलिस कर्मचारी यांचे बाल विवाह रोखण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अशाप्रकारे बाल विवाह होण्याचे प्रमाण जास्त राहू शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून बाल विवाह रोखण्यासाठी सहकार्य करावे तसेच बाल विवाह होणार नाही याची दक्षता ठेवावी. असे प्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाईल असे आवाहन बाल सौरक्षण अधिकारी नितीन साठवणे यांनी केले आहे. तर कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तसेच विशेष करून बाल विवाह प्रतिबंधात्मक माहिती देण्यासाठी १०९८ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन चाईल्ड लाईन भंडारा समन्वय लोकप्रिया देशभ्रतार यांनी केले आहे.