अकोला : दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीला यंदा महागाईचे ‘फटाके’ बसले आहेत. विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किंमतीमध्ये १० ते ४० टक्क्यांपर्यंतची मोठी वाढ झाली. त्यामुळे दिवाळीत फटाके खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.
हेही वाचा >>> सततच्या सर्दी, ताप, खोकल्याने मुले बेजार ; नागपुरातील बालरोग तज्ज्ञांचे निरीक्षण
दिवाळी सण १० दिवसांवर आला. दिवाळीच्या तयारीसाठी लगबग सुरू झाली आहे. खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. यंदा नागरिकांमधील उत्साह लक्षात घेता फटाक्यांची विक्री वाढून मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. त्यातच विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. सुतळी बॉम्ब, बुलेट बॉम्ब, पोपट, लवंगी आदी आवाजांच्या फटाक्यांचे पाच ते १५ टक्क्यांपर्यंतचे दर वाढले. फुलझड्या, झाड, चक्री, रॉकेट या प्रकारच्या नामांकित व इतर कंपन्यांच्या किंमतीमध्ये १५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सर्वाधिक २० ते ४० टक्के दरवाढ आकाशात उडणाऱ्या फटक्यांची झाली आहे. एकूण सर्व प्रकारच्या फटाक्यांची दरवाढ लक्षात घेता सरासरी २० टक्के वाढ झाल्याचे विक्रेते म्हणाले.
हेही वाचा >>> पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?
यावर्षी फटाका विक्री व्यवसायाला विक्रमी दरवाढीचे ग्रहण लागले आहे. फटाके निर्मितीसाठी बेरियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट, अल्युमिनियम पावडर, कॉपर कोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी अशा कच्च्या मालाचा वापर केला जातो. यंदा यापैकी अनेक गोष्टींच्या किंमतीमध्ये लक्षणीय अशी वाढ झाली. शिवाय कामगारांची वाढलेली बेसुमार मजुरी तसेच डिझेल-पेट्रोलच्या किंमतीतील सततच्या वाढीमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च, विजेचे वाढलेले दर या सर्व बाबींमुळे फटाक्यांच्या किंमती वाढल्या आहेत. शिवाय दारूगोळा आणि रसायनांच्या किमती वाढल्याने शिवकाशी येथून मागवलेले फटाके वाढीव दराने बाजारपेठेत आले आहेत. यंदा फटाक्यांच्या दरामध्ये सरासरी २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. फटाक्यांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या विविध साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली. सातत्याने इंधन दरवाढ होते. त्यामुळे फटाक्यांचे दर वाढले आहेत, असे घाऊक फटाके विक्रेते सैफुद्दिन बंदूकवाले यांनी सांगितले. तर फटाक्यांच्या विविध प्रकारात २० ते ४० टक्क्यांपर्यंतची वाढ झाली. वाढलेल्या दराने फटाक्यांची घाऊक खरेदी करावी लागली आहे. आता त्यावर किरकोळ नफा ठेवून यावर्षी आम्हाला फटाके विकावे लागणार आहेत, असे फटाके विक्रेता असोसिएशनचे श्याम महाजन म्हणाले.