लोकसत्ता टीम
यवतमाळ : नाणं खरं असलं की ते कुठेही खणखणीत आवाज करतं. तसेच खरे टॅलेन्ट कधीच लपून राहत नाही. असाच काहीसा अनुभव उमरखेड तालुक्यातील एकंबा (वन) येथील इयत्ता सहावित शिकत असेलल्या अनिकेतबाबत येत आहे. तो डोळ्याची पापणी न लवता अवघ्या दीड मिनिटात तब्बल १२० तालुक्यांची नावे सांगतो. त्याचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून, आतापर्यंत या चॅनलवरील व्हिडीओंना पाच कोटींच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत.
अनिकेत रवींद्र पांडे नावाचा हा विद्यार्थी आपल्या आजी आजोबाजवळ राहतो. ९०० लोकवस्तीचे एकंबा गाव जंगलातच आहे. या जंगलात असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत तो शिक्षण घेत आहे. आई अर्चना, वडील रवींद्र दोघेही रोज मजुरीकरिता जातात. ते सतत बाहेरगावी राहत असल्याने अनिकेत आजी आजोबासोबत गावात राहतो. शेती आणि मजुरीशिवाय त्यांच्याकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नाही. कितीही संकटे आली तरी शिकून मोठा अधिकारी बनायचेच असे स्वप्न अनिकेत बघत आहे. अनिकेतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची शाळा आणि तेथील शिक्षकसुद्धा महत्वाची कामगिरी बजावत आहे.
एकंबा येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यत जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आहे. ५० विद्यार्थ्यासाठी येथे केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मुख्याध्यापक कल्याण बोंबले, विषय शिक्षक अविनाश नरवाडे यांनी मिळून ‘माझे विद्यार्थी आणि मी’ या नावाचे यु ट्यूब चॅनल सुरू केले. या उपक्रमासाठी त्यांना गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड यांचेही सहकार्य लाभले. या यु ट्यूब चॅनलवर शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम टाकत असतात. या शाळेतील विद्यार्थी सर्व विषयांवरील उपक्रमांचे व्हिडिओ यु ट्यूब चॅनलवर टाकत असतात. त्याना हजार आणि लाखाच्या घरातच व्ह्यूज मिळतात.
अनिकेत पांडे हा चुणचुणीत विद्यार्थी आहे. एकदा सांगितलेले त्याला लगेचच समजते आणि त्याच्या स्मरणात राहते. त्याने विदर्भातील जिल्हे, तालुके याची माहिती मिळवली. ती एकदा, दोनदा वाचली आणि शिक्षकांनी त्याचा व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओत अनिकेत विदर्भातील अकराही जिल्हे, त्यांचे तालुके आदी माहिती न अडखळता अवघ्या दीड मिनिटांत सांगतो. या चॅनलवरील व्हिडीओंना आतपर्यंत तब्बल पाच कोटीहून अधिक व्ह्यूज त्याला मिळाले आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्याचा हा सुद्धा एक विक्रम ठरला आहे.
स्पर्धच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थीं शैक्षणिक क्षेत्रात मागे राहू नये. त्यांनाही प्रशासकीय सेवेत जाण्याची संधी मिळावी, या हेतूने मार्गदर्शन करण्यासाठी यु ट्यूब चॅनलचा उपक्रम सुरू करण्यात आला. मुलांचा शैक्षणिक उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर टाकले. ते व्हिडिओ बघून मुलांचे कौतुक होत असल्याने त्यांचाही उत्साह वाढला. विद्यार्थ्यांमध्ये पाठांतर करण्याची चढाओढ लागली. त्यातूनच अनिकेतचा व्हिडिओ व्हायरल झाला, असे मुख्याध्यापक कल्याण बोंबले यांनी सांगितले. शहरी भागातील शाळांच्या तुलनेत ग्रामीण भागात टॅलेन्टची कोणतीही कमी नसल्याच्या प्रतिक्रिया हा व्हिडिओ बघून समाजमाध्यमातून उमटत आहेत.