वर्धा: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली आहे. मात्र एका छोट्या गावातील वातावरण पण सुन्न झाले असल्याचे चित्र आहे. वायफाड हे ते गाव. २००६ मध्ये पंतप्रधान असतांना डॉ. मनमोहन सिंग या गावास भेट देण्यास आले होते. त्यावेळी झालेली त्यांची भेट शेतकरी आत्महत्या समस्या देश पातळीवार नेणारी ठरल्याचे म्हटल्या जाते.
देशाचे पंतप्रधान येणार म्हणून गावात कमालीची उत्सुकता पसरली होती. गावालागत हेलिपॅड तयार करण्यात आले. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. रस्ता चकाचक झाला. कारण हेलिपॅड दोन किलोमीटर दुरवर होते. पंतप्रधान डॉ. सिंग हे शाळेपर्यंत चालत चालतच आले. वाटेत संवाद साधत होते. त्यावेळी मागास वस्तीतून जात असतांना काहींनी रस्ता, स्वच्छतागृह नसल्याचे सांगितले. पोरं रिकामी आहेत, नौकऱ्या नाहीत अश्या तक्रारी झाल्या. डॉ. सिंग यांनी निमूटपणे त्या ऐकल्या. शाळेत आले आणि स्थानापन्न झाले. ठराविक लाभार्थी सरकारी योजनाचा लाभ सांगू लागले. याची तयारी प्रशासनाने करूनच ठेवली होती. मात्र हे साचेबद्ध उत्तर नव्हे तर खरे प्रश्न डॉ. सिंग यांच्यापुढे जायला हवे, म्हणून शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी काही हुशार तरुण व महिलांचा प्रश्न विचारणारा गट तयार करून ठेवला होता. माजी उपसरपंच मनोज चांदुरकर हे या गटाचे पुढारी.सरकारी व स्वयंसेवी शेतकरी असे प्रश्न विचारणारे दोन गट झाले. टोकदार प्रश्न चांदुरकर गट हिंदीतून मांडू लागला. तेव्हा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना मराठीतून बोला मी हिंदीत त्याचे भाषांतर करून पंतप्रधान यांना सांगतो, असा सोयीचा पवित्रा घेतला. चांदुरकर सांगतात की खरी परिस्थिती पुढे येवू नये म्हणून हा पवित्रा असल्याचे लक्षात आल्यावर आम्ही हिंदीतून चांगले बोलू शकतो, असे स्पष्ट केले. आम्हास कर्जमाफी नको, अनुदान नको. हमी भाव चांगला द्या. तसेच शेतकरी कुटुंबाचे श्रमाचे मूल्य त्यात जोडा. त्याची किंमतच होत नसल्याचे सांगितले.
हेही वाचा >>>अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
मात्र पंतप्रधान डॉ. सिंग अवाक झाले ते एका मुलीच्या प्रश्नानेच. बारावीत शिकणाऱ्या या मुलीने मत मांडले ही साहेब मी शेतकऱ्याची मुलगी आहे. आम्ही शेतीवर जगतो. त्यात माझे शिक्षण करतांना बाबाच्या नाकी नऊ येतात. कुटुंबाचे शेतीवर भागत नाही. कर्ज असल्याने सावकार तगादा लावतात. म्हणून शेतकरी नवरा नकोच असे वाटते. शेती साठी काही करां नं! असे त्या मुलीने म्हटले आणि उपस्थित सर्व थक्क झाले. त्यात पंतप्रधान पण होते. प्रश्न झाल्यावर पंतप्रधान सिंग मग संबोधित करतांना म्हणाले की देशाच्या अर्थकरणाची शेती व उद्योग ही दोन चाके आहेत. मात्र शेती हे चाक दुर्लक्षित झाले आहे. त्याची झळ अनेकांना बसत आहे. काही तरी करू, असे आश्वासन त्यांनी दिले. लगेच नंतर डॉ. सिंग यांनी शेतकरी पॅकेज घोषित केले. तसेच मोठी कर्जमाफी केली. हमी भाव वाढवून दिले. मनोज चांदुरकर म्हणतात डॉ. सिंग यांच्या कार्यकाळात जो हमी भाव मिळाला तो तसा त्या प्रमाणात कधीच मिळाला नाही.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट होण्यामागे काही पार्श्वभूमी होती. प्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ यांनी एका लेखमालेतून विदर्भातील शेतकरी आत्महत्याचा प्रश्न वेशीवर टांगला. ते या वायफड गावी येऊन गेले होते.त्याची मग चर्चा सूरू झाली. नंतर कृषी तज्ञ् डॉ. स्वामिनाथन यांनी या गावास भेट दिली. नंतर राहुल गांधी येऊन गेल्याचे चांदुरकर सांगतात. शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी डॉ. स्वामिनाथन फॉउंडेशनची शाखा गावात सूरू केली. त्यामार्फत शेतकरी वर्ग समस्या समजून घेऊ लागला. डॉ. मनमोहन सिंग यांना प्रश्न विचारणारे हे याच फाउंडेशन मार्फत तयार झालेले युवक होते. त्यांनी सरकारी लाभार्थी यांचे प्रश्न बाजूला सारत खऱ्या शेतकरी समस्या मांडल्याने उपाय मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटल्या जाते.