नागपूर : गेली ७० वर्षे आपण हीन भावनेने रडत होतो. गुलामगिरीच्या मानसिकतेत जगत होतो. मात्र आता गुलामीच्या बेड्या तोडून विकसित भारताकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. राष्ट्रीय गौरवाचा इतिहास लिहिला जात असताना त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान अतुलनीय आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. येथील माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटर इमारतीचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, संस्कृतीच्या विस्तारावरच देशाचे अस्तित्व अवलंबून असते. आपल्या देशावरील शेकडो वर्षांची गुलामी आणि परकीयांच्या क्रूर आक्रमणांनी सामाजिक संस्कृती व रचना पुसण्याचा प्रयत्न केला. परंतु भारताची सामाजिक जाणीव कुणीही संपवू शकले नाही. अशा कठीण काळातही भारतीयत्वाची जाणीव जागृत ठेवणाऱ्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या. या चळवळींनी भेदभावाच्या भिंती तोडून समाजाला एकतेच्या सूत्रात जोडले. स्वामी विवेकानंदांनी नैराश्यात जाणाऱ्या समाजाला मूळ संस्कृतीची आणि राष्ट्रीयत्वाची ओळख करून दिली. पारतंत्र्याच्या शेवटच्या दिवसांत डॉ. केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींसारख्या महान व्यक्तींनी नवीन ऊर्जा देण्याचे काम केले. संघाचे सेवासंस्कार अनेक पिढ्यांना कार्यासाठी प्रेरणा देत आहेत. सीमा भाग असो की जंगल आणि डोंगराळ भागातही संघाचे स्वयंसेवक काम करतात. ‘जेथे सेवा कार्य तेथे स्वयंसेवक’ ही गोळवलकर गुरुजींची शिकवण आमच्या जीवनाचा मंत्र असून, दुसऱ्यांच्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी आपल्याला कार्य करायचे आहे, असे आवाहन मोदींनी केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, गोविंद देव गिरी महाराज व्यासपीठावर उपस्थित होते. सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले, या देशातील लोकांनी संघाचे काम पाहिल्यामुळे आज आमच्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली असून त्यातून माधव नेत्रालयासारखी सेवाभावी संस्था उभी आहे. कुठलीही अपेक्षा न करता लोकांच्या जीवनात प्रकाश देण्याचे काम ही संस्था करते. सेवा हेच संघाचे सूत्र आहे असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही माधव नेत्रालयाच्या कार्याचे कौतुक केले. माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यांनी प्रास्ताविक केले.

संघाच्या परिश्रमातूनच विकसित भारताचा इतिहास

संघाच्या इतक्या वर्षांच्या परिश्रमातून विकसित भारताचा नवा इतिहास लिहिला जात आहे. संघाची स्थापना झाली तेव्हा परिस्थिती वेगळी होती. १९२५ ते १९४७ हा संघर्षाचा काळ होता. स्वातंत्र्य हे लक्ष्य देशासमोर होते. आज संघाच्या शंभर वर्षांच्या यात्रेनंतर देश वेगळ्या वळणावर आहे. २०२५ ते २०४७ या कालखंडात मोठे लक्ष्य आमच्यासमोर आहे. डॉ. हेडगेवार आणि गुरुजींचे मार्गदर्शन आम्हाला कायम ऊर्जा देत राहील, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

शंभर वर्षांपूर्वी राष्ट्रीय जाणिवेचे संवर्धन व संरक्षणासाठी ज्या विचारांचे रोपटे लावले गेले ते महान वटवृक्ष म्हणून जगासमोर उभे आहे. सिद्धांत आणि आदर्श या वटवृक्षाला पुन्हा मोठे करतात. लाखो, कोट्यवधी स्वयंसेवक याच्या फांद्या आहेत. हा साधारण वटवृक्ष नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक ‘अक्षयवट’ आहे. नरेंद्र मोदी, पंतप्रधान