नागपूर : दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संमेलनाचे उद्घाटन केवळ नऊ ते दहा लोकांच्या उपस्थितीत विज्ञान भवनात करायचे नियोजन आहे. परंतु, साहित्य महामंडळ, आयोजक, घटक संस्थेतील सुमारे २० जण पंतप्रधानांसोबत मंचावर बसण्यास उत्सुक असल्याने व त्यातील अनेकांचा पत्ता कापला जाणार असल्याचे कळल्याने रुसवे-फुगवे सुरू झाल्याची माहिती आहे.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी या काळात होत आहे. संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याने मंचावरील मान्यवरांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. एरवी उद्घाटनीय सत्रात साहित्य महामंडळ, आयोजक, घटक संस्थेतील पदाधिकारी व आजी-माजी संमेलनाध्यक्ष असे सुमारे २० जण मंचावर असतात. यंदा पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही संख्या कमी करण्याची व नऊ ते दहापर्यंतच मर्यादित ठेवण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सूत्रांनी सांगितले.
या सूचनेमुळे आयोजक व साहित्य महामंडळ यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे. कारण, पंतप्रधानांसोबत मंचावर बसण्यासाठी इच्छुकांची यादी मोठी आहे. यातले सारेच तूल्यबळ असल्याने कोणाला पुढे करायचे व कोणाला मागे ठेवायचे, हा यक्षप्रश्न आयोजक व महामंडळाला अस्वस्थ करीत आहे. त्यातच पंतप्रधानांसोबत मंचावर बसणाऱ्या मान्यवरांच्या यादीत आपले नाव नाही, असे कळल्याने काहींनी नाराजीही व्यक्त केल्याचे कळते. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी महामंडळाच्या अध्यक्षांना संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
नियोजित संमेलनाध्यक्षांना सूत्र कोण सोपवणार?
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मावळते संमेलनाध्यक्ष नियोजित संमेलनाध्यक्षांना सूत्र सोपवत असतात. साहित्य संमेलनाच्या ९७ वर्षांच्या इतिहासात अपवाद वगळता ही परंपरा काटेकोरपणे पाळण्यात आली आहे. परंतु, यंदा पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या परंपरेला फाटा दिला जाण्याची शक्यता आहे. कारण, ९७ व्या साहित्य संमेलनाचे वर्तमान अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांना अद्याप उद्घाटनीय सत्रात उपस्थितीतबाबत अधिकृत निमंत्रण आलेले नाही. शोभणे मात्र संमेलनाच्या परंपरेनुसार निमंत्रण येईलच, अशी अपेक्षा बाळगून आहेत.