वर्धा : शंख हा हिंदू पुजा संस्कृतीतील महत्वाचा घटक आहे. पुजेचा आरंभ व सांगता शंखनाद करीत केली जातो. देवघरात पण शंख ठेवून त्याची पूजा होते. तो वाजविण्याचे कसब साध्य करणे सोपे नाही. त्यासाठी तपश्चर्य लागते, असे म्हटल्या जाते. ती एकाने साध्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी येथे गंगापूजन कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी झालेला शंखनाद सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. शंख वाजविणारे होते रामजनम योगी. त्यांनी तब्बल २ मिनिटे ४० सेकंद इतका वेळ शंख नाद केला होता. त्या कृतीने जगाचे लक्ष वेधल्या गेले, असे म्हटल्या गेले. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी त्याची प्रशंसा केली. ६३ वर्षीय योगी हे वाराणसचे निवासी आहेत.

हे योगी आता वर्ध्यात येणार. श्रीराम मंदीर देवस्थान व श्रीराम शोभायात्रा समितीतर्फे गुढी पाडवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ३० मार्च रोजी गुढीपाडवा ते ६ एप्रिल रोजी रामनवमी दरम्यान विविध सोहळे आयोजित आहे. याच दरम्यान रामजनम योगी यांच्या शंख वादनाचा कार्यक्रम होणार, अशी माहिती देवस्थानाचे उपाध्यक्ष संजीव लाभे यांनी दिली. योगी यांची तारीख निश्चित करण्याची जबाबदारी असलेले सचिन अग्निहोत्री हे म्हणाले की आज सायंकाळ पर्यंत योगी यांचे वर्धा आगमन निश्चित होणार. योग आल्यास वर्धा जिल्ह्यासाठी ती एक पर्वणी ठरेल असा विश्वास आयोजन समितीचे अरुण काशीकर, राजेंद्र उमाटे, कमल कुलधरिया, विजय धाबे, मनोज पाखिले, सुधीर भट यांनी पत्र परिषदेतून दिली.

पाडवा पहाट ३० मार्चला सोशलिस्ट चौकात पहाटे ५ पासून सूरू होणार असून प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर व श्रावणी वागळे यांची हजेरी लागणार. संगीत संयोजन अनिरुद्ध जोशी करणार. नववर्षाचे स्वागत बहारदार भक्ती गीतांनी करण्याचा मानस आहे. शनिवारी पूर्वसंध्येस स्कुटर रॅली निघणार आहे. नागपूर येथील कथाकार किशोर गलांडे यांचे संगीतमय कथा वाचन आयोजित आहे. राम नवमीस सायंकाळी शोभायात्रा निघणार असून यात विविध देखावे, दिंड्या, ढोल पथक, नृत्य आदीचा सहभाग राहणार, अशी माहिती कुलधरिया यांनी दिली. या उपक्रमास दत्ता मेघे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री व अन्य मान्यवर हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात आले.