अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देश-विदेशात प्रचंड लोकप्रियता आहे. अनेक दिग्गज त्यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी आतूर असतात. नरेंद्र मोदींना लहान मुलांची विशेष आवड. दिल्ली येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी नरेंद्र मोदी खासदारांच्या चिमुकल्यांशी गुफ्तगू करतांना रमल्याचे चित्र दिसून आले. निमित्त होतं ते कौटुंबिक भेटीचे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिमुकल्यांना चॉकलेट देत, ‘तुम्ही देशाचे भविष्य आहात, खूप मोठे व्हा, यशस्वी व्हा’ असे आशीर्वाद दिले.

अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे युवा खासदार अनुप धोत्रे यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुटुंबीयांसह भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी समीक्षा धोत्रे, कु. यशिका, चि. रणविजय व कु. राजनंदनी उपस्थित होते. संपूर्ण अकोला लोकसभा मतदारसंघाच्यावतीने खा.अनुप धोत्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार अनुप धोत्रे यांच्यासोबत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, सामाजिक विषय, राज्यातील विकासात्मक कामे, शेतकऱ्यांचे प्रश्न, अकोला लोकसभा मतदारसंघातील मुद्दे यावर सविस्तर चर्चा केली. केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा महाराष्ट्राला होत असलेल्या लाभाची देखील त्यांनी माहिती घेतली. केंद्र सरकारकडून जनतेच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत? हे देखील त्यांनी जाणून घेतले. महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या कारभारावर सुद्धा चर्चा करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांच्या चिमुकल्यांशी आपुलकीने संवाद साधला. चिमुकल्यांच्या आवडी-निवडी जाणून घेतल्या. पंतप्रधानांनी चिमुकल्यांना खाऊ देत त्यांचा लाड केला. खूप अभ्यास करा, मोठे होऊन देशहिताचे कार्य करा, असे पंतप्रधानांनी  चिमुकल्यांना सांगितले.

पंतप्रधानांकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. संजय धोत्रे यांचा नरेंद्र मोदी यांच्या २०१९ च्या मंत्रिमंडळात समावेश होता. मात्र, प्रकृतीच्या कारणावरून सुमारे अडीच वर्षाच्या कालावधीनंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. प्रकृती अस्वस्थामुळे संजय धोत्रे सध्या सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे पूत्र अनुप धोत्रे यांना भाजपने उमेदवारी दिली व ते निवडून आले. पंतप्रधानांनी अनुप धोत्रे यांच्याकडून त्यांचे वडील संजय धोत्रे यांच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. काळजी घ्या, असे नरेंद्र मोदी म्हणाले.