नागपूर: नागपूर- बिलासपूर वंदेभारत एक्सप्रेसला रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. मध्य भारतातील ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे. महाराष्ट्रातील दुसरी अशा प्रकारची एक्स्प्रेस आहे. सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधानांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. तेथून ते थेट रेल्वे स्थानकावर गेले. तेथे नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही गाडी नागपूर ते बिलासपूर धावणार असून यामार्गात गोंदिया, दुर्ग या स्थानकावर ही थांबणार आहे. नागपूर ते बिलासपूर हा प्रवास साडेपाच तासात ही गाडी पूर्ण करणार आहे. गाडीचे सर्व दरवाजे स्वंयचलित असून जीपीएसवर आधारित माहिती फलक त्यात लावण्यात आले आहेत. डब्यात वायफाय सुविधा देण्यात आली आहे.