नागपूर, मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील ५२० किलोमीटरच्या नागपूर – शिर्डी टप्प्याचे उद्घाटन आज, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर लगेचच दुपारी २ वाजता हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. समृद्धीचा आरंभबिंदू असलेल्या शिवमडका येथे पंतप्रधान मोदी सकाळी १०.४५ वाजता पोहोचतील. त्यानंतर आरंभबिंदूपासून ते पुढे वायफळ टोल नाक्यादरम्यान १० किमी प्रवास करतील. पंतप्रधानांच्या हस्ते ११ वाजता फित कापून समृद्धीचे उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर तात्काळ ते पुढील कार्यक्रमासाठी मिहान, एम्सच्या दिशेने प्रस्थान करतील. उद्घाटनानंतर दुपारी २ वाजल्यापासून नागपूर – शिर्डी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होईल, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’तील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
या महामार्गावर १९ ठिकाणी टोल नाके असून ५२० किमीच्या प्रवासासाठी वाहनचालक/प्रवाशांना ९०० रुपये टोल भरावा लागणार आहे. मात्र त्याचवेळी ‘जितका प्रवास तितका टोल’ या नियमानुसार टोलवसुली करण्यात येणार आहे. या टप्प्यात १९ छेदमार्ग असून ज्या छेदमार्गावर वाहन उतरेल, तितक्या किमीसाठी टोल वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे ५२० किमीपेक्षा कमी अंतर प्रवास केल्यास ९०० रुपयांपेक्षा कमी रक्कम टोलपोटी भरावी लागणार आहे.
टोलवसुली यंत्रणाही सज्ज असून वाहनधारकांना फास्टॅग आणि रोख रक्कमेचा भरणा असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच १८ ठिकाणी पेट्रोल पंप आणि खानपान सेवा उपलब्ध करण्यात आली आहे, असेही ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांसमवेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय आणि राज्याचे मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
टप्प्याटप्प्याने सुरुवात..
मुंबई – नागपूर दरम्यानच्या ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. यादरम्यान महामार्गातील काही टप्प्यांचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे ‘एमएसआरडीसी’ने पाच टप्प्यात समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.
समृद्धीचे पाच टप्पे
टप्पा – अंतर (किमी) – उद्घाटन तारिख
नागपूर – शिर्डी – ५२० – ११ डिसेंबर २०२२
नागपूर – सिन्नर – ५६५ – फेब्रुवारी २०२३
नागपूर – भरवीर जंक्शन – ६०० – मार्च २०२३
भरवीर जंक्शन – इगतपुरी – ६२३ – मे २०२३
नागपूर – ठाणे (मुंबई) – ७०१ – जुलै २०२३ (नियोजन)
१९०१ पूल..४०० भुयारी मार्ग
समृद्धी महामार्गावर १९०१ छोटे-मोठे पूल आणि विविध प्रकारचे बांधकाम आहे. त्यात पाच बोगदे, ५० हून अधिक उड्डाणपूल, ४०० हून अधिक भुयारी मार्ग, ३०० हून अधिक पादचारी मार्ग, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी १०० हून अधिक भुयारी तसेच उन्नत मार्ग, २४ छेद मार्ग (इन्टरचेंजेस) आदी बांधकामांचा समावेश आहे. आतापर्यंत यापैकी १८०० बांधकामे पूर्ण झाली असून १०१ बांधकामे प्रगतीपथावर आहेत.
प्रकल्पाची वैशिष्टय़े..
– ७०१ किमीचा सहापदरी महामार्ग
– खर्च अंदाजे ५५ हजार कोटी रुपये
– १० जिल्हे आणि ३९० गावांना जोडणारा
– मुंबई – नागपूर अंतर केवळ आठ तासांत
– प्रकल्पासाठी २०,८२० हेक्टर जमीनसंपादन
– ८,५२० हेक्टर जागेचा वापर, १०१८० हेक्टर जागेवर टाऊनशिप
– एकूण २४ छेदमार्ग (इंटरचेंजेस)
– वेग मर्यादा ताशी १५० किमी, प्रत्यक्षात ताशी १२० किमीने प्रवास
– २६ टोल नाके, टोलसाठी प्रतिकिमी १.७३ रुपये दर
७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन
– मेट्रो- १ चे लोकार्पण, मेट्रो – भूमिपूजन, दोन मार्गिकांचे उद्घाटन
-नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा
– रेल्वे स्थानक आधुनिकीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन
– नागपूर- इटारसी तिसऱ्या मार्गाचे लोकार्पण
– नेशनल इन्स्टिटय़ूट ऑफ वन हेल्थृ, नाग नदी शुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन
– सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजीनियिरग अॅण्ड टेक्नोलॉजी, चंद्रपूरचे लोकार्पण
– सेंटर फॉर रिसर्च, मॅनेजमेंट अॅण्ड कंट्रोल ऑफ हीमोग्लोबिनोपैथिस, चंद्रपूरचे उद्घाटन