नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरातील माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टच्या विस्तारीत रुग्णालयाचे भूमिपूजन ३० मार्चला सकाळी १० वाजता आयोजित केले गेले आहे. या संस्थेच्या निर्मितीची कथा रोचक आहे. त्यानुसार चेन्नईतील संघ कार्यालयात ८ ऑगस्ट १९९३ मध्ये बाॅम्ब स्फोट झाला. त्यात अनेक स्वयंसेवकांचा मृत्यू तर काही जखमी झाले. त्यानंतरच्या घडामोडीतून प्रथम माधव नेत्रपेढी व कालांतराने माधव नेत्रालयाचा जन्म झाला. हा प्रसंग माधव नेत्रालयाच्या नेत्रांजली या मासिकेतून डॉ. छाया नाईक यांच्या लेखात मांडला आहे.
चेन्नईतील बाॅम्बस्फोटातील एक जखमीमध्ये संघाचे प्रचारक ना. काशिनाथजी यांचा समावेश होता. त्यांचे नेत्रदान झाले. या घटनेपासून प्रेरित झालेल्या तत्कालीन सरसंघचालक प्रो. राजेन्द्रसिह उपाख्य रज्जू भैया आणि सरकार्यवाह हो. वे. शेषाद्रीजी यांना त्यावेळी संपूर्ण भारतात नेत्रपेढ्या असाव्यात असे तीव्रतेने वाटले. त्यांनी संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून माधव नेत्रपेढीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे २५ फेब्रुवारी १९९५ ला नागपुरात पहिली माधव नेत्रपेढी सुरू झाली. सदर नेत्रपेढीची जबाबदारी डॉ. अविनाश चन्द्र अग्निहोत्री यांच्यावर होती. या नेत्रपेढीचे जाळे आता संपूर्ण भारतात पसरत आहे. नेत्रदानाच्या प्रचार प्रसाराची आवश्यकता लक्षात घेवून सुरूवातीच्या काळात नेत्रदान प्रचाराचे काम माधव नेत्रपेढीने हाती घेतल्याचेही लेखात डॉ. छाया नाईक यांनी सांगितले.
माधव नेत्रालयाकडून नेत्रदाणाचा जागर…
राज्यातील अनेक शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, कॉर्पोरेट ऑफिसेस, सरकारी कार्यालये, गावांमध्ये भरणाऱ्या जत्रा, मंदिरे, चर्च, प्रदर्शने अशा अनेक ठिकाणी पथनाट्य, व्याख्यान, विविध स्पर्धा आणि आता संगणकिय प्रेझेंटेशन अशा माध्यमातून माधव नेत्रालयातर्फे नेत्रदानाचा प्रचार सुरू झाला. त्यानिमित्त संघाशी संबंध न आलेलेही कार्यकर्ते या समाजोपयोगी कार्याशी जुळू लागले. सुरुवातीच्या काळात रात्री अपरात्री नेत्रदानासाठी फोन आला तर महिला डॉक्टरांसोबत आपल्या दुचाकीने जावून नेत्रदान घेणे आणि ते नेत्र (नेत्रपेढीत फ्रिज नसल्याने) हेडगेवार रक्त पेढीत पोचवणे ही कामेही कार्यकर्त्यांना करावी लागत. नंतर फ्रिज आला. टेक्निशियन नेमला गेला. वाहन मिळाले. आणि माधव नेत्र पेढीचे गाडे मार्गी लागले. सुरुवातीला मिळत असलेला बुब्बुळ खाजगी किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणासाठी देण्यात येत होते. कालांतराने आपले स्वतःचे नेत्र चिकित्सालय असणे गरजेचे आहे. त्यातून माधव नेत्रालय स्थापन करण्याची कल्पना पुढे आली आणि नागपुरात माधव नेत्रालयाची स्थापना १९९५ साली झाली. नागपुरातील गजानन नगर येथे सिटी सेन्टर तर हिंगणा रोडवर वासुदेव नगर येथे प्रिमियम सेन्टर नेत्र रुग्णालय सुरू झाल्याचेही डॉ. छाया नाईक यांनी लेखात स्पष्ट केले.