नागपूर: चंद्रपूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसवर हल्लाबोल केल्यावर दोनच दिवसाने म्हणजे उद्या (गुरुवारी) १० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भ दौऱ्यावर येत असून त्यांची रामटेक मतदारसंघातील कन्हानमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेत मोदी कोणाला लक्ष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ८ एप्रिलला पूर्व विदर्भातीलत चंद्रपूर येथे मोदींची प्रचार सभा झाली. त्यात त्यांनी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटावर टीका केली होती. ही शिवसेना नकली आहे, असे ते म्हणाले होते. दोनच दिवसांनी म्हणजे १० एप्रिलला मोदी पुन्हा पूर्व विदर्भात येत असून या दरम्यान ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हानमध्ये प्रचार सभेला संबोधित करणार आहे.
रामटेक हा भाजप-शिंदे शिवसेना युतीत शिंदे गटाला सुटलेला मतदारसंघ असून येथे सेनेतर्फे राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे रिंगणात आहेत. वंचितचा पाठिंबा लाभलेले अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांच्यासह बसपाचे उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. येथील विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्या ऐवजी काँग्रेसमधून ऐनवेळी शिंदे सेनेत दाखल झालेले राजू पारवे यांना सेनेने रिंगणात उतरवले आहे. तुमाने यांना उमेदवारी देण्यास भाजपचा विरोध होता. त्यामुळे वरील फेरबदल करण्यात आला. त्यामुळे ही जागा जशी सेनेसाठी प्रतिष्ठेची आहे तशीच भाजपची प्रतिष्ठाही येथे दावणीला लागली आहे. या पार्श्वभूमीवर मोदींची प्रचारसभा महत्वाची ठरणार आहे. मोदींच्या प्रचारसभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकचा दौरा केला. काही ठिकाणी प्रचार सभाही घेतल्या व उमेदवार बदलामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांची समजूत घालण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासाठी ही जागा किती महत्वाची आहे हे लक्षात येते.
हेही वाचा : सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
मोदी कोणाला लक्ष्य करणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रचार सभेत काँग्रेसला लक्ष्य करतात. रामटेक हा राखीव अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. त्यामुळे मागासवर्गीयांसाठी केंद्र शासनाने राबवलेल्या योजनांची माहिती मोदी देतील व याच मुद्यावर काँग्रेसला धारेवर धरतील. त्याच प्रमराणे रामटेकचे धार्मिक महत्वही आहे. अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे श्रेय भाजप घेत आहे. त्यामुळे या मुद्यावरही मोदी भाष्य करतील,असे बोलले जात आहे.
हेही वाचा : “नवरा-बायकोमध्ये भांडण लावू नका,” नवनीत राणांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला
मोदी गडमंदिरात जाणार का ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच रामटेकला येत असून ते येथील प्रसिद्ध श्रीरामाच्या गडमंदिराला भेट देणार का याबाबत उत्सूकता आहे.