नागपूर –  पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ३० मार्चला नागपूर  दौऱ्यावर येत  आहेत. त्यांचे या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार पासून कार्यक्रम स्थळी व त्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वंयसेवक ते प्रचारक असा प्रवास असणाऱ्या मोदींनी ते पंतप्रधान झाल्यानंतर नागपूरमध्ये येऊनही संघभूमीवर जाणे टाळले होते. याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. पण कधीही मोदींनी याबाबत भाष्य केले नव्हते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी विदर्भात आलेल्या मोदींचा मुक्काम नागपुरात राजभवनात होता, पण रेशीमबागेतील संघाचे स्मृती मंदिर किंवा महालातील संघ मुख्यालयात ते गेले नाहीत.

यावेळी मात्र खास संघाशी संबंधित एका नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या निमित्ताने गुडीपाडव्याला म्हणजे ३० मार्चला मोदींचा नागपूर दौरा ठरला. या दौऱ्यात त्यांचा पहिला कार्यक्रम संघभूमी अशी ओळख असलेल्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिरात होणार आहे. हेडगेवार यांच्या समाधीचे ते दर्शन घेणार आहेत. नेत्रालय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांच्यासोबत व्यासपीठावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत असणार आहेत.  मोदी अन्य कार्यक्रमातही उपस्थित राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स ९ वा. नागपूर विमानतळावर आगमन होणार असून तेथून ते थेट रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्मृती मंदिर स्थळी जाणार आहेत. तेथे हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते  दीक्षाभूमीला भेट देतील.  दहा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते हिंगणामार्गावरील माधव नेत्रालयाच्या प्रीमिअम केंद्राची पायाभरणी होणार आहे. त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करतील.  दुपारी १२:३० वाजता, अमरावती  मार्गावरील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड येथे लॉइटरिंग युद्धपयोगी सामग्री चाचणी तळ  आणि यूएव्हीसाठी धावपट्टी सुविधेचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल. त्यानंतर पंतप्रधान बिलासपूरला रवाना होतील.