नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या ११ वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच रेशीमबाग येथील संघाच्या स्मृती मंदिराला रविवारी भेट देणार आहेत. या भेटीत ते संघाचे आद्या सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील.

नागपुरातील पाच तासांच्या वास्तव्यात मोदी हे दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत. मोदी आणि संघाचे घनिष्ठ नाते आहे. राजकीय जीवनाला सुरुवात होण्यापूर्वी मोदी यांनी पूर्णवेळ प्रचारक म्हणून अनेक वर्षे संघात काम केले. पंतप्रधान झाल्यानंतर ते कधी अनेकदा नागपुरात आले. या दौऱ्यांत त्यांनी दीक्षाभूमीलाही भेट दिली. परंतु संघाच्या मुख्यालयात ते कधीच गेले नव्हते. रविवारी गुढीपाडव्याला मात्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नागपुरात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी मोदी हे सकाळी ९ वाजता रेशीमबागच्या स्मृती मंदिर येथील डॉ. हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील. स्मारक समितीच्या वतीने भैयाजी जोशी पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत.

पाच तासांत अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

मोदी यांचे सकाळी ९ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होणार असून तेथून ते थेट रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्मृती मंदिरस्थळी जाणार आहेत. तेथे हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते दीक्षाभूमीला भेट देतील. दहा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते हिंगणामार्गावरील माधव नेत्रालयाच्या प्रीमिअम केंद्राची पायाभरणी होणार आहे. त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करतील. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, गोविंदगिरी महाराज उपस्थित राहणार आहेत. यानंतर दुपारी १२:३० वाजता अमरावती मार्गावरील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड येथे लॉइटरिंग युद्धोपयोगी सामग्री चाचणी तळ आणि यूएव्हीसाठी धावपट्टी सुविधेचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल. त्यानंतर ते बिलासपूरला रवाना होतील.