नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपुरात आले. नागपूर विमानतळावर सकाळी ८:३० आगमन झाल्यावर मोदी थेट रेशिमबाग येथील संघ स्मृती मंदिर परिसरात गेले. यावेळी त्यांनी डायरीत संदेश लिहिला. त्यांच्या ११ वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच रेशीमबाग येथील संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
आरएसएसचे शताब्दी वर्ष सुरु असल्यामुळे मोदींचा हा दौरा विशेष मानला जात आहे. शिवाय या दौऱ्यात संपूर्ण वेळ सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे मोदींसोबत असणार आहेत. तर नुकत्याच झालेल्या नागपुरातील हिंसाचारच्या घटनेनंतर पंतप्रधान नागपुरात येत असल्यामुळे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून मोदींच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवरती ‘एक है तो सेफ है’ हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोदींनी दिलेला नारा लिहिल्याचं दिसत आहे.
या निवडणुकीत लोकांनी भाजपला भरभरून मतदान केले. त्यानंतर राज्यात बहुमताचं सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे आता मोदी नागपुरात येत असताना बॅरनवर लिहिलेली ‘एक है तो सेफ है’ ची घोषणा सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. या घोषणेची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. संघ मुख्यालयातील भेट आणि हे बॅनर्स आणि हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर भाजप आणि संघ पुढील नेमकी काय रणनीती ठरवणार आहे याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्यभर जोरदार प्रचार केला. मात्र, या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘हम एक है, तो सेफ हैं’ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या दोन घोषणांची बरीच चर्चा झाली. अशातच विदर्भातील एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, “लोकांची एकजूट राहिली नाही, तर काँग्रेस त्यांचे आरक्षणाचे फायदे हिसकावून घेईल. त्यामुळेच मी म्हणतो, ‘हम एक है, तो सेफ हैं’ (आपण एकत्र राहिलो, तरच सुरक्षित राहू)”. मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रचारसभेत ‘हम एक है, तो सेफ हैं’चा नारा दिला होता.
४७ चौकांमध्ये भाजपचे शक्तीप्रदर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूर दौरा असल्याने भारतीय जनता पक्षाकडून त्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. या दौऱ्यानिमित्त भाजपकडून शहरातील विविध चौक सजविण्यात आले. तसेच ४७ चौकांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करण्यात आले.