लोकसत्ता टीम
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपुरात आले. नागपूर विमानतळावर सकाळी ८:३० आगमन झाल्यावर मोदी थेट रेशिमबाग येथील संघ स्मृती मंदिर परिसरात गेले. यानंतर मोदी दीक्षाभूमीमध्ये गेले. दीक्षाभूमीमध्ये मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे दर्शन केले. भगवान गौतम बुद्ध यांना मोदी यांनी नमन केले.
मोदींनी दीक्षाभूमी येथे १५ मिनिटांचा कालावधी घालविला. यावेळी भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्यासह भंते उपस्थित होते. मोदी यांनी काही मिनिटे दीक्षाभूमी येथे ध्यानसाधना केली असल्याची माहिती आहे. मोदींनी दीक्षाभूमी भेटीबाबत एक संदेशही लिहिला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. पंतप्रधान म्हणून मोदींची ही दीक्षाभूमीला दुसरी भेट आहे. पंतप्रधान यांचे स्वागत करण्यासाठी दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येत भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
दोनदा भेट देणारे पहिले पंतप्रधान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या दीक्षाभूमीला पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा भेट दिली. दीक्षाभूमीला दोनदा भेट देणारे आतापर्यंतचे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. दीक्षाभूमीवर प्रस्तावित भुयारी वाहनतळाला विरोध झाल्यानंतर सौंदर्यीकरण आणि विकास प्रकल्पाचे काम ठप्प पडले असतानाच प्रशासन मोदींच्या दीक्षाभूमी भेटीसाठी विशेष तयारी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली होती. तेव्हापासून येथे दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात येतो. तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन, प्रतिभाताई पाटील आणि रामनाथ कोविंद यांनीही या ठिकाणी भेट दिली.
तसेच तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग यांनीदेखील दीक्षाभूमीचे दर्शन घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी १४ एप्रिल २०१७ रोजी दीक्षाभूमीला पहिल्यांदा भेट दिली होती. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२६ वी जयंती होती. आता ते आठ वर्षांनी पुन्हा दीक्षाभूमीवर येत आहेत. यावेळी मात्र, वेगळी पार्श्वभूमी आहे.
भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंकण्याची घोषणा केली होती. भाजपला एवढ्या जागा राज्यघटना बदलण्यासाठी हव्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा खूप तापला होता. भाजपला त्याचा फटका बसला. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी संविधान आणि डॉ. आंबेडकरांशी संबंधित गोष्टींना प्राधान्यक्रम देण्यास सुरुवात केली आहे. मोदींच्या हस्ते संघ परिवारातील संस्थेच्या रुग्णालयाचे भूमिपूजन होत आहे. त्यासाठी ते नागपुरात आले असून यावेळी दीक्षाभूमीलाही भेट दिली.