नागपूर : पंतप्रधान बनण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. यानंतर पंतप्रधान झाल्यावर ते अनेकदा नागपूरमध्ये आले, पण त्यांनी स्मृती मंदिराला भेट देण्याचे टाळले. पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात मोदींनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली.
रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाल्यावर मोदींचा ताफा थेट रेशीमबागच्या दिशेने गेला. मोदी यांनी १५ मिनिटांचा कालावधी संघ कार्यालय परिसरात घालवला. मोदींनी आद्या सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांचे समाधीस्थळ, तसेच द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या यज्ञवेदीस्वरूप स्मृतिचिन्हाचे दर्शन घेतले. मोदी यांचे स्वागत करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
‘‘हेडगेवारजी आणि पूज्य गुरुजी यांना कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या स्मृतींना जपणाऱ्या या स्मृती मंदिरात येऊन मी भारावून गेलो आहे. संघाच्या या दोन महान स्तंभांची आठवण देणारी ही जागा देशसेवेसाठी समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा केंद्र आहे,’’ असा अभिप्राय मोदींनी भेटीनंतर लिहिला.
‘दीक्षाभूमी न्यायासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते’
पंतप्रधान मोदी यांनी दीक्षाभूमीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतले. भगवान गौतम बुद्ध यांना मोदी यांनी नमन केले. मोदींनी दीक्षाभूमी येते १५ मिनिटांचा कालावधी घालवला. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्यासह भंते उपस्थित होते. मोदी यांचा शाल देऊन स्मारक समितीने सत्कार केला. यावेळी गडकरी, फडणवीस देखील उपस्थित होते. पंतप्रधान म्हणून मोदींची ही दीक्षाभूमीला दुसरी भेट आहे. यापूर्वी २०१७ साली मोदी दीक्षाभूमीला आले होते. दीक्षाभूमीच्या वातावरणात बाबासाहेबांचे सामाजिक समता आणि न्याय यांचे सिद्धांत प्रकर्षाने जाणवतात. दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि शोषितांसाठी सन्मान, हक्क आणि न्यायासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते, असा संदेश मोदी यांनी दीक्षाभूमीबाबत लिहिला.