नागपूर – स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर चर्चेसाठी वेळ न दिल्यास काळे झेंडे दाखवू, असा इशारा देणाऱ्या विदर्भवाद्यांना पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीपासूनच ताब्यात घेणे सुरू केले. माजी आमदार व कट्टर विदर्भवादी वामनराव चटप यांना रविवारी मोदींच्या आगमनापूर्वी स्थानबद्ध करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ३३० मार्चला नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी विदर्भवाद्यांनी पंतप्रधानाना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती तसेच त्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी केली होती. पण प्रशासनाने ती नाकारली, त्यामुळे मोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा विदर्भवाद्यांनी दिला होता. या आंदोलनामुळे कायदा व सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रपासूनच विदर्भवाद्यांना ताब्यात घेणे सुरू केले. सुनील चोखारे यांना अबांझरी पोलिसांनी मध्य रात्रीनंतर ताब्यात घेतले तसेच कट्टर विदर्भवादी नेते व माजी आमदार वामनराव चटप यांच्यासह १६ कार्यकर्त्यांना शनिवारी पहाटे पोलिसांना ताब्यात घेतले. त्यांना बर्डीत स्थानबद्ध करून ठेवण्यात आले. अशाच प्रकार इतरही काही पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले, असे चटप यांनी सांगितले.