लोकसत्ता टीम

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपुरात आले. नागपूर विमानतळावर सकाळी ८:३० आगमन झाल्यावर मोदी थेट रेशिमबाग येथील संघ स्मृती मंदिर परिसरात गेले. त्यांच्या ११ वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच रेशीमबाग येथील संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली.

यावेळी त्यांनी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. स्मृती मंदिरात मोदी यांचे स्वागत करण्यासाठी स्वतः सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

मोदी आणि संघाचे घनिष्ठ नाते आहे. राजकीय जीवनाला सुरुवात होण्यापूर्वी मोदी यांनी पूर्णवेळ प्रचारक म्हणून अनेक वर्षे संघात काम केले. पंतप्रधान झाल्यानंतर ते कधी अनेकदा नागपुरात आले. या दौऱ्यांत त्यांनी दीक्षाभूमीलाही भेट दिली. परंतु संघाच्या मुख्यालयात ते कधीच गेले नव्हते. रविवारी गुढीपाडव्याला मात्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नागपुरात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. स्मारक समितीच्या वतीने भैयाजी जोशी यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.