लोकसत्ता टीम
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २० सप्टेंबरला वर्ध्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेतून कुशल कारागिरांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असून या योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. त्याची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात ५० हजार उपस्थितीचे लक्ष्य असून जिल्हा प्रशासन याची जबाबदारी घेत आहे.
उद्योगमंत्री सामंत म्हणतात…
याच कार्यक्रमात महाराष्ट्रातील एकमेव अशा अमरावती येथील ‘पीएम मेगा टेक्सटाईल पार्क’ची पायाभरणीही आभासी पद्धतीने होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रपरिषदेत दिली. उदय सामंत यांनी सभास्थळाची पाहणी करून जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आणखी वाचा-भाजप नेत्याचे स्वपक्षालाच आव्हान! म्हणाले, “उमेदवारी मिळाली नाही तरी…”
पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना कीटवाटप केले जाणार असून पंतप्रधान लाभार्थ्यांशी संवादही साधणार आहेत. हा कार्यक्रम देशभरात ७०० ठिकाणी पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अमरावती येथील १ हजार २० एकरात होणाऱ्या ‘मेगा टेक्सटाईल पार्क’ची पायाभरणीही या कार्यक्रमात आभासी पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमाला ७० ते ७५ हजार लोकांची उपस्थिती राहण्याचा अंदाज आहे. यासोबतच सुक्ष्म व लघु उद्योग मंत्रालयाच्यावतीने प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. पत्रपरिषदेला जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची उपस्थिती होती.
आणखी वाचा- नागपूर: ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ… असे आहेत आजचे दर…
गडचिरोलीचे भाग्य उजळणार
गडचिरोली आता उद्योगनगरी म्हणून नावारुपास येणार आहे. गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जायचा. परंतु आता गडचिरोलीत जवळपास ८० ते ९० हजार कोटींचे प्रकल्प येत असून गडचिरोली आता उद्योगनगरी म्हणून नावारुपास येईल, असे सामंत यांनी सांगितले. तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी असावी, यासाठी सातत्याने सरकाराचे प्रयत्न सुरू आहेत. याकरिता विदर्भावर लक्ष केंद्रीत केले असून विदर्भात उद्योग उभारणी करुन रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे, असेही सामंत म्हणाले.