अकोला : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ दिवसांत दुसऱ्यांदा विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. वर्धा येथे २० सप्टेंबरला दौरा केल्यानंतर आता वाशीम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी ५ ऑक्टोबरला येणार आहेत. या संभाव्य दौऱ्यात पंतप्रधानांसोबत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर केंद्रीय व राज्यातील मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे.
नंगारा भवनाचे २०१९ मध्ये भूमिपूजन
वाशीम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा भवन हे भव्य संग्राहालय उभारण्यात आले आहे. युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या भवनाला मंजुरी मिळाली होती. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या भवनाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या सोहळ्यातूनच त्यावेळी निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत ही भव्य वास्तू उभारण्यात आली. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंगारा भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. या कार्यक्रमाची जोमाने तयारी केली जात आहे.
हेही वाचा >>>पोलिसांना झाले तरी काय ? अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या दोन पोलिसांना अटक
कार्यक्रमस्थळी प्रतिबंधात्मक आदेश
पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रम स्थळाच्या सभोवताली ड्रोन अथवा तत्सम हवाई साधने, ‘पॅराग्लायडर’, ‘पॅरामोटर्स’, ‘हँडग्लायडर्स’ आदींचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. १ ते ५ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तसेच ४ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत जगदंबा माता संस्थान व परिसरात नागरिकांच्या प्रवेशास निर्बंध राहतील.
हेही वाचा >>>Teosa Vidhan Sabha Constituency : यशोमती ठाकूर यांच्यासमोर आव्हान कोणाचे ?
राजकीय दृष्ट्या नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे महत्त्व
राज्यात नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील १० दिवसांत लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा राजकीय दृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचा राहील. राज्यात अनेक मतदारसंघात बंजारा समाजाची निर्णायक मतदार संख्या आहे. बंजारा समाजाची गठ्ठा मतपेढी लक्षात घेत महायुतीने त्यासाठी मोर्चेबांधणी केली. बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या पोहरादेवी येथे विकासात्मक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. आता पोहरादेवी येथे निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन पंतप्रधान मोदी नेमकी काय भूमिका मांडतात? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.