नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा अनेक अर्थानी वैशिष्टय़पूर्ण ठरला. या दौऱ्यात त्यांनी ढोलवादनाचा आनंद लुटला. तसेच मेट्रोतून प्रवास केला. तसचे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक करून त्यांच्या समर्थकांना खूश केले. पंतप्रधानांच्या दौऱ्याची अनेक वर्षांपासून नागपूरकरांना प्रतीक्षा होती. मेट्रोच्या कार्यक्रमाला येण्याचे निश्चित होऊनही दोन वेळा त्यांचे कार्यक्रम ऐन वेळी रद्द झाले होते. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.
सकाळी ९.३० वाजता पंतप्रधानांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. सकाळी मेट्रोतून प्रवास करताना त्यांचे तिकीट खरेदी करणे अनेकांना भावले. त्यानंतर समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाच्या वेळी त्यांनी ढोलवादन केले. या वेळी अनेकांचे त्यांनी लक्ष वेधून घेतले. याच कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर थाप मारून त्यांचे कौतुक केले. जाहीर सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख विकासाची तळमळ असलेला नेता असा केला. दरम्यान, विमानतळावरून रेल्वे स्थानकावर जाताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वागत केले.
मोदींच्या हस्ते लोकार्पण, उद्घाटन..
* हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उद्घाटन
* नागपूर मेट्रो टप्पा-१ लोकार्पण
* नागपूर मेट्रो टप्पा-२ भूमिपूजन
* नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस शुभारंभ
* नागपूर आणि अजनी रेल्वे पुनर्विकास शुभारंभ
* अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर राष्ट्राला समर्पित
* नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प भूमिपूजन
* सेंटर फॉर स्कीलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (सपेट), चंद्रपूर लोकार्पण