नागपूर : वादग्रस्त हॉटेल व्यावसायिक प्रिन्स तुली याने एका महिलेशी अश्लील चाळे करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अटक केली. मात्र, सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रिन्स तुलीला अंबाझरी पोलीस ठाण्यात ‘व्हिआयपी ट्रिटमेंट’ दिल्याचा आरोप आहे. त्याला पोलिसांनी शितपेय आणि अन्य सुविधा पुरविल्याचा आरोप असून प्रिन्स तुलीचे काही छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे. मात्र, ठाणेदार गजानन कल्याणकर यांनी हे सर्व आरोप नाकारले असून त्या बाटलीत पाणी असल्याचे सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वादग्रस्त हाॅटेल व्यवसायी प्रिन्स तुलीला अंबाझरी पोलिसांनी मुंबईतून अटक केली. प्रिंस तुली याने १६ मे रोजी तक्रारकर्त्या महिलेच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली होती. गैरव्यवहार करीत आक्षेपार्ह भाषा वापरली. त्याने एक चित्रफितही समाजमाध्यमावर प्रसारित केली. महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्या नंतर विनयभंग, शिवीगाळ व धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईतील जे. डब्ल्यू. माॅरियट या पंचतारांकीत हाॅटेलमधून अंबाझरी पोलिसांच्या पथकाने प्रिंस तुलीला अटक केली.