नागपूर : सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन प्राप्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागते. अनेकदा कार्यालाचे उंबरठे झिजवावे लागते. त्यामुळे कर्मचारी मेताकुटीस येतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रधान महालेखाकार कार्यालयाने डिजीटल यंत्रणेचा वापर करून अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीवेतनासाठी करावी लागणारी पायपीट थांबण्याची शक्यता आहे. व्हीडीयो कॉलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना त्यांच्या अडचणी संबंधित अधिकाऱ्यांना सांगता येणार आहे.

 विदर्भ आणि मराठवाड्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रधान महालेखाकार कार्यालयाने अनेक पातळींवर डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात प्रामुख्याने पेंशनर्स समाधान, डिजिटल पेशन योजना, ऑनलाइन गुगल फॉर्म, टोल फ्री क्रमांक १८००२३३७८३४, ई-मेल डेस्क, दूरध्वनी संपर्क सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचबरोबर डिजिटल स्वाक्षरी असलेली पेंशन पेमेंट ऑार्डर कार्यपद्धती सुरू केली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमात असलेल्या कुठल्याही कामांत आता अडथळा येणार नाही याची दक्षता महालेखाकार कार्यालयाने घेतल्याची माहिती  वरिष्ठ उपमहालेखाकार (निवृत्तीवेतन) डॉ. भूषण भिरूड यांनी दिली. 

हेही वाचा >>>पोलीस पाटलांंच्या भरतीचा गैरव्यवहार पोहोचला काेर्टात….कमी गुण घेणाऱ्यांना मौखिक परीक्षेत….

मराठवाडा व विदर्भातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्या त्या कोषागार कार्यालयातच माहिती मिळावी यादृष्टीने तालुका कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी यांना सूचना दिल्या  आहेत.  सर्वसामान्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मनात निवृत्तीवेतनाबाबत अनेक समज-गैरसमज असतात. याबाबत शासनाने वेळोवेळी निवृत्तीवेतन प्रक्रियेबाबत कार्यालय प्रमुख यांना माहिती करून दिलेली आहे. याचबरोबर आस्थापना शाखेच्या कर्मचाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन आपल्या कार्यालयातील निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाबाबत पुढे कोणती अडचण येऊ नये यासाठी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे डॉ. भिरूड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>घरी रुग्णाना बेड, प्राणवायू सिलेंडर, साहित्य हवे….मग, उचला फोन आणि या क्रमांकावर…..

नव्याने सुरू केलेल्या डिजिटल स्वाक्षरी पेंशन प्राधिकारामुळे अनेक प्रक्रिया सुलभ झाल्या आहेत. यात निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेंशन प्रकरणाच्या स्थितीबद्दल एसएमएसद्वारे सूचना पाठविणे, निवृत्तीवेतनधारकांचे प्राधिकार  राज्य सरकारच्या महाकोष संकेतस्थळावरून डाऊनलोड करणे, आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना दक्ष करणे, मृत्यू सेवानिवृत्ती उपदान प्राधिकार आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचबरोबर एखाद्या निवृत्तीवेतनधारकाच्या तक्रारीचे योग्य समाधान करावयाचे झाल्यास व्हिडिओ कॅालद्वारे संपर्क साधण्याची सुविधा प्रधान महालेखाकार कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

निवृत्तीवेतनधारकांना महालेखाकार कार्यालयाकडून आवश्यक सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी हा विभाग दक्ष असून विभागाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे तसेच ईमेल द्वारे संपर्क साधण्याचे आवाहन प्रधान महालेखाकार जया भगत यांनी केले आहे.