नागपूर : मुख्याध्यापकाने कार्यालयात सुटीचा अर्ज घेऊन आलेल्या शिक्षिकेला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच तिला अश्लील शिवीगाळ करून बाहेर हाकलून दिले. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणात शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पितांबर नारायण गायधने (रा. नरखेड) असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांच्या माहितीनुसार, पितांबर गायधने हा एका नामांकित शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. त्याच शाळेत पीडित महिला शिक्षिका पदावर कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुख्याध्यापक गायधने तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. तिच्यावर अश्लील शेरेबाजी करीत होता. तिला नको तेथे स्पर्श करून गैरवर्तन करीत होता. तिला विनाकारण मुख्याध्यापकाच्या कार्यालयात बोलून तासनतास बसून ठेवत होता. शिक्षिकेला अनेकदा मैत्री ठेवण्याची सक्ती गायधने याने केली. मात्र, शिक्षिका वारंवार नकार देऊन त्याला टाळात होती.

हेही वाचा – आठ लाखांचे देयक! चार लाखांची लाच, २० टक्क्यांत तडजोड…

हेही वाचा – पिकांवरील रोगांचा उपाय आता मोबाईलवर!

तक्रार केल्यास नोकरीवरून काढण्याची भीती असल्याने तिने कुणाकडे तक्रार केली नव्हती. मात्र, गेल्या आठवड्यात शिक्षिका सुटीचा अर्ज घेऊन मुख्याध्यापकाच्या कार्यालयात गेली होती. शिक्षिकेला मुख्याध्यापकाने सुटी मंजूर करण्यापूर्वी शारीरिक संबंधाची मागणी केली. तिच्याकडे बघून अश्लील चाळे केले. तिने नकार देताच चिडलेल्या गायधने याने तिला अश्लील शिवीगाळ केली आणि कार्यालयाच्या बाहेर हाकलून दिले. तिने रडत रडत अन्य शिक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने नरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून मुख्याध्यापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Principal demand for physical contact to grant leave to the teacher adk 83 ssb