वर्धा : जिल्हा परिषदेच्या वाघोली येथील प्राथमिक शाळेतील मुलांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. शालेय पोषण आहारातून ही विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. अन्नाचे नमूने प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्यानंतर तेल व मोट हे पदार्थ खाण्यास योग्य नसल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले. त्याचा ठपका मुख्याध्यापक अरूण पोहाणे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांनी त्यांच्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांना निलंबीत करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी आज घेतला आहे. १० डिसेंबरला ही घटना घडली होती. या दिवशी शाळेतील पोषण आहार घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना डोकेदुखी, ताप, चक्कर येणे अश्या तक्रारी सुरू झाल्या. ५७ विद्यार्थ्यांना हिंगणघाटच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुखरूप आहे. या संदर्भात हिंगणघाट गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून चौकशी करण्यात आली. पोषण आहारातील तेल व मोट हे अन्न पदार्थ खाण्यास योग्य नसल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>> भंडारा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील शेकडो बेरोजगारांची फसवणूक!

शाळेचे मुख्याध्यापक म्हणून धान्य व अन्य खाद्यपदार्थांची तपासणी करण्याचे काम अरूण पोहाणे यांचे होते. मात्र, त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले नसल्याचे स्पष्ट होते. विद्यार्थ्यांना झालेली विषबाधा ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब असून त्यामुळे वर्धा जिल्हा परिषद प्रशासानाची बदनामी झाली आहे, असा ठपका मुख्याध्यापक पोहाणे यांच्यावर ठेवण्यात आला. मुख्याध्यापकांनी जिल्हा सेवा नियमाचा भंग केला. म्हणून त्यांना निलंबीत करण्यात येत आहे, असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे. निलंबन काळात मुख्याध्यापक पोहाणे यांना समुद्रपूर पंचायत समिती मुख्यालयात राहणे बंधणकारक आहे. गट शिक्षणाधिकारी समुद्रपूर यांच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद आहे.

हेही वाचा >>> “मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?

शालेय पोषण आहारात विषबाधा झाल्याची ओरड झाल्याने जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. आमदार समीर कुणावार यांनी रूग्णालयास भेट देवून लहान विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच पोषण आहाराची बाब ही जबाबदारीची असल्याने संबंधीत शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांनी दक्ष राहण्याची सूचना आ. कुणावार यांनी केली. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी पण रूग्णालयास भेट देवून मुलांच्या उपचारात कसलीच उणीव ठेवू नये, आवश्यक ते सर्व उपचार करावे अशा सूचना केल्या होत्या. या घटनेने वाघोली गावातील गावकरी पण भयभीत झाले होते. आता मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई झाल्याने पोषण आहाराची बाब सर्व शाळेत गंभीरतेने घेतल्या जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जाते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd 64 zws