लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : अमरावती कारागृहात बंदिस्त असलेला एक कैदी करोना काळात दिलेल्या सुट्टीवर वेळेवर परतला नाही, म्हणून कारागृह प्रशासनाने त्याला आता नव्याने सुट्टी देण्यास नकार दिला. कैद्याने याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका केल्यावर कारागृह प्रशासनाचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. कैद्याचा सुट्टीचा अर्ज चार आठवड्यात मंजूर करण्याचे आदेश न्यायमूर्ती वृषाली जोशी आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने कारागृह प्रशासनाला दिले आहेत.

मूळत: ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असलेला एक ४० वर्षीय कैदी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. २०२१ साली करोना काळात कैद्याला पॅरोलवर सुट्टी देण्यात आली होती. मात्र तो २६ दिवस उशीरा कारागृहात पोहोचल्याचा दावा कारागृह प्रशासनाने न्यायालयात केला. आता कैद्याने फर्लोवर सुट्टीसाठी कारागृ़ह प्रशासनाकडे अर्ज केला. मात्र कारागृह प्रशासनाने मागील वेळी वेळेवर न परतल्याचे कारण देत अर्ज नामंजूर केला. यानंतर कैद्याने उच्च न्यायालयात याचिका केली.

आणखी वाचा-मराठाप्रमाणे आता ईडब्ल्यूएस सर्वेक्षणाची मागणी का होतेय? वाचा…

न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर कैद्याचा सुट्टीचा अर्ज चार आठवड्याच्या कालावधीत मंजूर करण्याचे आदेश दिले. संबंधित कैदी हा मागील पाच वर्ष आणि पाच महिन्यापासून कारागृहात आहे. मागच्या सुट्टीचे कारण वगळता त्याच्यावर अन्य काहीही आरोप नाही,त्यामुळे त्याचा सुट्टीचा अर्ज नाकारणे चुकीचे होईल, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. याशिवाय करोना काळात दिलेल्या सुट्टीच्या वेळी परतीची तारीख निश्चित नव्हती. त्यामुळे कैदी वेळेवर परत आला नाही, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. याचिकाकर्ता कैद्याच्यावतीने ॲड.रत्ना सिंह यांनी बाजू मांडली तर कारागृह प्रशासनाच्यावतीने ॲड. नंदिता त्रिपाठी यांनी युक्तिवाद केला.

‘पॅरोल’ आणि ‘फर्लो’मध्ये फरक काय?

‘पॅरोलमध्ये कैद्याला वर्षात ३० दिवस सुट्टी दिली जाते. याला परिस्थितीनुसार आणखी ६० दिवस वाढविण्याची तरतुद आहे. ‘फर्लो’मध्ये वर्षातून एकदा १४ दिवस सुट्टी मिळते. विशेष परिस्थितीत यात आणखी १४ दिवसाची वाढ करता येते. पॅरोलच्या काळाची शिक्षेच्या कालावधीत गणना केली जात नाही तर फर्लोचा कालावधी शिक्षेत मोजला जातो. साधारणत: पॅरोल हा कमी शिक्षेच्या कालावधीत मंजूर केला जातो तर फर्लो अधिक कालावधीच्या शिक्षेच्या वेळी दिला जातो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prisoner denied leave for not returning on time from last leave court found decision of prison administration wrong tpd 96 mrj