नागपूर : आणीबाणीच्या काळात कारावासात गेलेल्यांना शासनाकडून मानधन दिले जाते. मात्र अनेकदा नावात, बँक खाते क्रमांकात चुका असेल तर मानधन मिळण्यास विलंब होतो किंवा अनेकदा ते परत येते किंवा दुसऱ्यांच्याच नावावर जमा होते. हा प्रकार टाळण्यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आता थेट कोषागार कार्यालयाच्या माध्यमातूनच मानधन वाटपाचा मानस व्यक्त केला आहे.
हेही वाचा – सहा चित्त्यांच्या मृत्यूनंतर जाग; ११ सदस्यीय समिती करणार चित्ता प्रकल्पाचे पुनरावलोकन
शासनाकडून बँकाकडे निधी वळता केला जातो व तेथून लाभार्थ्यांना वाटप होते. मात्र खाते क्रमांक चुकीचा असेल व नाव चुकीचे असेल तर मानधन परत जाते, सारखे आडनाव किंवा नाव असलेल्या व्यक्तीच्याबाबतीत इतर व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया कोषागार कार्यालयाच्या माध्यमातून राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे वरील बाबी घडण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी पॅन कार्ड, रद्द केलेला धनादेश, आधार कार्ड जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर (सामान्य) शाखा येथे व्यक्तीश: कार्यालयात हजर राहून जमा करावे. त्यामुळे त्यांच्या मानधनाची रक्कम खात्यात जमा करणे शक्य होईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी कळविले आहे.