वाशीम : नागपूरवरून नांदेडकडे जाणाऱ्या खासगी बसला आज पहाटे ४ ते ५ वाजतादरम्यान अचानक आग लागली. प्रवाशांना आग लागल्याचे लक्षात येताच बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आणि सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. यामुळे जीवितहानी टळली, मात्र बस व इतर साहित्य जळून खाक झाले.

हेही वाचा – अमरावती : बाजार समित्‍यांच्या निवडणुकीनंतर आता सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?

प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथून नांदेडकडे जात असताना खासगी बसने वाशीम शहरापासून जवळच असलेल्या जागमाथा परिसरात अचानक पेट घेतला. प्रवाशांनी तात्काळ चालकाला माहिती दिली. चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर पडले. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण बस जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत असून बसचे व इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे.