लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : अमरावतीहून धारणी येथे जात असलेली खासगी प्रवासी बस सेमाडोह नजीक पुलावरून कोसळून झालेल्‍या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्‍यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. सात जण गंभीर जखमी असल्‍याने त्‍यांना अमरावतीच्‍या जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात हलविण्‍यात आले आहे. उर्वरित १८ जखमींवर अचलपूर येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळीत चार जण दगावले होते तर दोघे उपचारासाठी रुग्णवाहिकेतून परतवाड्याच्या दिशेने निघाले असतानाच रस्त्यात दगावल्‍याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

आणखी वाचा-आनंदवार्ता… ‘एसटी’च्या ताफ्यात आणखी २,५०० बसगाड्या येणार

अपघातानंतर तत्‍काळ मदत कार्य सुरू करण्‍यात आले. अपघात घडताच सेमाडोह येथील रहिवासी घटनास्थळी धावून गेले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले. नदीत कोसळलेल्या अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या अपघाताची माहिती परतवाडा, चिखलदरा आणि धारणी पोलिसांना देण्यात आली. बचाव पथक अपघात स्थळी पोहचले आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. अपघातस्थळी स्थानिक पोलिस अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून मदतकार्य पूर्ण केले.

या मार्गावर अनेकदा अशा घटना घडतात. वळण रस्त्यावरील अपघातांचा धोका लक्षात घेता प्रशासनाने या मार्गावर अधिक सुरक्षा उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. प्रवाशांसाठी योग्य सूचना फलक आणि रस्त्याचे व्यवस्थित देखभाल आवश्यक आहे, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. यापुर्वीही या मार्गावर अनेक अपघात घडले आहे. परतवाडा ते धारणी हा मार्ग घाट वळणाचा आहे. रस्‍ता अरूंद आहे. पुलावर चालकांना काळजी घ्‍यावी लागते. थोडेही दुर्लक्ष हे प्राणघातक ठरू शकते.

आणखी वाचा-अशोक चक्रावर झाडूच्या चित्रावरून वाद, कॉंग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले…

गेल्‍या २४ मार्च रोजी सेमाडोह नजीक एसटी महामंडळाची बस खोल दरीत कोसळून झालेल्‍या अपघातात दोन महिलांचा मृत्‍यू झाला होता, तर २५ जण जखमी झाले होते. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्‍याने हा अपघात झाला होता. अमरावती वरून निघालेली परतवाडा आगाराची एम एच ०७ / ९४७८ क्रमांकाची बस परतवाडा घटांग, सेमाडोह मार्गे तूकईथड येथे जात असताना हा अपघात झाला होता. सेमाडोह नजीक जवाहर कुंड येथे ही बस सुमारे ३० फूट खोल दरीत कोसळली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private bus fell off a bridge in melghat 40 passengers injured and three in critical condition mma 73 mrj