उत्पन्न वाढीसाठी ‘एनएमआरसीएल’चा पर्याय; कमीत कमी तिकिट दर ठेवण्याचाही विचार
कमीत कमी तिकीट दर ठेवून जास्तीत जास्त प्रवाशांना मेट्रो रेल्वेकडे आकर्षित करण्यासाठी इतर मार्गाने उत्पन्न वाढविण्याचा पर्याय म्हणून नागपूर मेट्रो रेल्वेस्थानक शहरातील नामवंत कंपन्यांकडून विकसित करून त्याला त्यांचे नाव देण्याच्या पर्यायावर नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड (एनएमआरसीएल)कडून विचार केला जात आहे. ‘एनएमआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी तसे संकेत दिले आहेत.
नागपूर मेट्रो रेल्वे हा ८६८० कोटी रुपयांचा प्रकल्प असून तो २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प ‘एनएमआरसीएल’ने केला आहे. यासाठी विदेशी बँकेकडून कर्ज घेतले जाणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरू असून मार्च किंवा एप्रिल महिन्यात या कर्जाचा पहिला हप्ता मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावर येणारा खर्च लक्षात घेता तो भरून काढण्यासाठी तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न हा प्रमुख पर्याय असला तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करावा, असे व्यवस्थापनाचे धोरण असल्याने तिकीट दर किफायतशीर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या इतरही स्रोतांचा विचार केला जात आहे. रेल्वे स्थानकावरील जागेच्या व्यावसायिक वापराचाही त्यात समावेश आहे. दरम्यान, या रेल्वेस्थानकांचा नागपूरमधील नामवंत कंपन्यांच्या माध्यमातून विकास करण्याचा व त्या स्थानकांना या कंपन्यांचे नाव देण्याचा विचार केला जात आहे. मेट्रो रेल्वेच्या स्थापना दिनाच्या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बिजेश दीक्षित यांनी याबाबत संकेत दिले. ते म्हणाले की, देशभरात नागपूरची ओळख निर्माण करणाऱ्या नामवंत कंपन्या शहरात आहेत. त्यात हॉटेल व्यावसायिक, आईस्क्रीम व्यावसायिक, आयुर्वेद औषध निर्मिती कंपन्यासह इतरही काही बडय़ा कंपन्यांचा समावेश आहे. यांनी मेट्रो रेल्वेच्या प्रमुख स्थानकांचा विकास केल्यास त्या स्थानकांना त्यांच्या कंपनीचे नाव देण्याचा पर्याय आहे. यामुळे ‘एनएमआरसीएल’चा स्थानकावरील खर्च वाचेल, याचा फायदा तिकीट दर किफायतशीर ठेवण्यासाठी होईल, असे दीक्षित या वेळी म्हणाले.

सुटीच्या दिवशी प्रवाशांना आकर्षित करणार
शनिवार, रविवार आणि इतरही सुटीच्या दिवशी मेट्रोमध्ये प्रवाशांची संख्या वाढावी म्हणून मेट्रोतील प्रवास हा पर्यटन पूरक कसा ठरेल, या दृष्टीने विचार केला जात आहे. शहरातील कस्तुरचंद पार्क, अंबाझरी तलाव, बर्डी जंक्शन, रामझुला यासारखी मेट्रोची अनेक स्थानके ‘टुरिस्ट स्पॉट’ म्हणून विकसित करणे शक्य आहे. प्रत्येक स्थानकावर जवळच्या टुरिस्ट स्पॉटची माहिती दिली जाणार आहे. नागपूरमधील विविध क्षेत्रातील कलावंतांनी मोठे नाव कमाविले आहे. नागपूरलाही ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. ही सर्व माहिती प्रत्येक स्थानकावर देण्याचा ‘एनएमआरसीएल’चा विचार असून यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होईल, असे दीक्षित म्हणाले.

मेट्रोची वाटचाल
* १८ फेब्रु २०१५ – मेट्रो रेल्वे महामंडळ लिमिटेडची स्थापना
* २७ मार्च – फ्रेन्च शिष्टमंडळाची नागपूरला भेट, प्रकल्पाची पाहणी
* १ एप्रिल – दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाची प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती
* ३१ मे – प्रकल्पाच्या खापरी कार्यालयाच्या कामाला सुरुवात
* २ जून – जर्मन बँकेच्या शिष्टमंडळाशी चर्चा
* ८ जुलै – युरोपियन बँक शिष्टमंडळाशी चर्चा
* ४ ऑगस्ट – मॉरिस कॉलेजची १.९९ हेक्टर जागा मेट्रोला स्थानांतर
* २६ ऑगस्ट – एसआरपीफ (२६.०७ हे.) शासकीय तंत्रनिकेतन (०.०४७ हे.), पटवर्धन हायस्कूल (०.२२ हे.) जागा प्राप्त
* २ सप्टें – जपानच्या शिष्टमंडळाशी चर्चा

Story img Loader