दलालांकडून मेडिकलमधील मृत्यू संख्येचा दाखला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(भाग-२)

महेश बोकडे, नागपूर</strong>

खासगी प्रयोगशाळेतील दलाल मेडिकलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना येथील प्रयोगशाळेत चुकीचे अहवाल तयार होत असल्याचे सांगतात. त्यासाठी वाढत्या मृत्यू संख्येचा दाखलाही देतात. एकदा का नातेवाईक घाबरले की मग ते स्त:च  रक्त, मल-मूत्रासह इतर नमुने थेट खासगी प्रयोगशाळेच्या दलालांना सोपवतात. मेडिकल प्रशासन असा प्रकार नाकारत असले तरी खुद्द रुग्णाचे नातेवाईकच नाव न सांगण्याच्या अटीवर मेडिकलमध्ये हा दहशतीचा प्रकार घडत असल्याचे सांगतात.

मेडिकलमध्ये बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती, औषधशास्त्रसह विविध २० विभाग असून त्यांच्या अखत्यारित सुमारे ५० वार्ड येतात. त्यात काही विभागांच्या अतिदक्षता विभागांचाही समावेश आहे. येथील अत्यवस्थ रुग्णांना रोज विविध पद्धतीच्या  तपासणींची गरज असते. या रुग्णांना येथील शासकीय प्रयोगशाळेऐवजी मेडिकल चौकातील खासगी तपासणी केंद्रात पाठवले जाते. त्यासाठी नातेवाईकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार केले जाते. यासाठी खासगी प्रयोगशाळेचे दलाल येथील काही डॉक्टर- कर्मचाऱ्यांच्या मदतीने विविध वार्डात प्रवेश मिळवतात. ते स्वत:ला रुग्णाचे नातेवाईक असल्याचे भासवतात. शासकीय प्रयोगशाळेत अनेक रुग्णांचे तपासणी अहवाल चुकत असल्याचे भासवून येथील प्रयोगशाळेच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करतात व त्यानंतर येथील मृत्यू संख्येची माहिती देत नातेवाईकांच्या मनात दहशत निर्माण करून  विशिष्ट प्रयोगशाळेत तपासणीचा सल्ला देतात. येथे रुग्णांच्या तपासण्या वाढल्यास त्याकामी मदत करणाऱ्याला भेटवस्तूचा लाभ दिला जातो.

अनेक नातेवाईकांनी तोंडी स्वरूपात तर काही संघटनांकडून लेखी स्वरुपात वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठात्यांकडे हा मुद्दा मांडला आहे. परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.

मृत्यू जास्त असल्याची कारणे?

खासगीत रुग्णाची प्रकृती खालवल्यास तेथील मृत्यू कमी दाखवण्यासाठी बरेच रुग्ण थेट मेडिकल, मेयोत पाठवले जातात. मेडिकलला येणाऱ्या रुग्णांची प्रकृती अत्यंत नाजूक असण्याचे प्रमाण जास्त असल्याने येथे मृत्यूची संख्या जास्त दिसत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात.

मेडिकलमधील मृत्यूची स्थिती

वर्ष             मृत्यू संख्या

२०१६         ६,००१

२०१७         ५,५२५

२०१८          ५,८१२

एकूण          १७,३३८

‘‘मेडिकलमध्ये रुग्णांच्या रक्त, मल-मूत्रासह इतरही नमुने तपासण्याची सोय असून त्याचा दर्जाही चांगला आहे. येथे शासनाने अद्ययावत यंत्रासह तज्ज्ञही उपलब्ध केले आहेत. त्यामुळे येथील तपासणीच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करून कुणी नमुने खासगी प्रयोगशाळेत पाठवत असल्यास ते चुकीचे आहे. या प्रकरणाची तक्रार नसली तरी चौकशी करून योग्य कार्यवाही केली जाईल.’’

– डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private laboratory agents spreading rumors about hospital lab zws