नागपूर : मानकापूर पोलिसांनी प्रिया बागडेचा रामटेकच्या जंगलात निर्जनस्थळी पुरलेला मृतदेह घटनेच्या २५ दिवसांनी बुधवारी सायंकाळी तहसीलदारांच्या उपस्थितीत काढला. यावेळी आरोपी प्रियकर महेश वळसकर (५७, रा. सोमवारीपेठ, सक्करदरा), मानकापूरचे पोलीस निरीक्षक इंगोले, सहायक पोलीस निरीक्षक पाटील, सारकर उपस्थित होते. मृतदेह काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर प्रियाची हत्या कशी केली, कोणत्या शस्त्राचा वापर केला, हे स्पष्ट होईल.
पोलिसांनी आरोपीला न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने त्याची १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. पोलीस आता त्याची सखोल चौकशी करतील. पोलीस तपासात महेशने प्रियाची हत्या केल्याचे मान्य केले नाही. प्रियाने स्वत:च विषारी द्रव्य प्राशन केले. नंतर ती तशीच पडून होती. तिला रुग्णालयात घेऊन गेलो नाही, नंतर तिचा मृत्यू झाला, असे महेशने पोलिसांना सांगितले आहे. पोलीस कोठडीदरम्यान हत्येचा उद्देश, कोणत्या शस्त्राने हत्या केली. हत्येत किती लोक सहभागी होते आणि मृतदेह पुरण्यात कोणी मदत केली, याबाबतचा संपूर्ण तपास करण्यात येणार आहे.
हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांची चिंता वाढणार, सर्वच परीक्षा लांबणार?
घटनाक्रम असा…
प्रिया ही १५ ऑगस्टपासून अचानक बेपत्ता झाली. तिचा मोबाईल बंद येत असल्यामुळे तिच्या आईने खोलीवर जाऊन बघितले. घराला कुलूप दिसल्याने तिने शेजाऱ्यांकडे चौकशी केली. ती आठवडाभरापासून घरी नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मानकापूर पोलीस ठाण्यात प्रिया बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी प्रियाचे लोकेशन घेऊन तपास करण्यास सांगितले. मानकापूरच्या ठाणेदार स्मीता जाधव यांच्या नेतृत्वातील पथकाने तपास केला असता तिचे शेवटचे लोकेशन रामटेकमधील एका रिसॉर्टमध्ये आढळून आले. हा रिसॉर्ट आरोपी महेश वळसकर याच्या मालकीचा आहे.
हेही वाचा – मंत्री गिरीश महाजनांवर उच्च न्यायालयाची नाराजी, काय आहे प्रकरण?
अशी झाली ओळख
महेशची दुधाची भुकटी तयार करण्याची कंपनी आहे. त्या कंपनीत प्रिया कामाला होती. तेव्हापासून दोघांची ओळख झाली. कंपनीतच दोघांची मैत्री जुळली. प्रिया ही महेशच्या रिसॉर्टवर गेली. तिने लग्नासाठी महेशवर दबाव टाकला. त्यामुळे महेशने तिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह रिसॉर्टपासून तीन किमी अंतरावर पुरला, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. शवविच्छेदन अहवालानंतरच प्रियाची हत्या नेमकी कशी करण्यात आली, याचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.