गडचिरोली : गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या सरकारने मोठ्या उद्योगपतींसाठी गोरगरीब आदिवासींच्या जमिनी बळजबरी लाटल्या. त्यांना सामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. शिक्षण, आरोग्याची दुरवस्था दूर झालेली नाही. बेरोजगारी भरमसाठ वाढली आहे. असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला. जिल्ह्यातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी २० नोव्हेंबरला डोळसपणे निर्णय घ्या, असे आवाहन केले.
आरमोरी क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ देसाईगंज येथे आयटीआय मैदानावर प्रियंका गांधी यांनी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, महाविकास आघाडीचे आरमोरी क्षेत्राचे उमेदवार रामदास मसराम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, उद्धवसेनेचे सुरेंद्रसिंह चंदेल आदी उपस्थित होेते. प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणातून महिला, बेरोजगार, शेतकरी, आदिवासी बांधवांना साद घातली.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचार गाडीची तोडफोड
त्या म्हणाल्या, कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशात काँग्रेसने मतदारांना दिलेल्या आश्वसनांची पूर्तता सत्तेत बसल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु केली. आम्ही विकासाची गॅरंटी घेतो अन् शब्द पाळतो. आमची नीती व नियत साफ असल्याचा दावा करुन त्या म्हणाल्या, गडचिरोलीत आजही आरोग्य, शिक्षण, रस्त्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. मृत मुलाला घेऊन एका पित्याने १५ किलोमीटर पायपीट केली, रुग्णवाहिका मिळत नाही. ही दूरवस्था संपणार तरी कधी, असा सवाल त्यांनी केला. सिकलसेल, ॲनिमिया ही इथली समस्या आहे. राज्यात १६ हजार तर एकट्या गडचिरोलीत चार हजारांवर अधिक रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
जल, जंगल, जमिनीवर आदिवासींचा हक्क
आदिवासी संस्कृती ही अतिशय महान आहे, असे आमच्या आजी इंदिरा गांधी नेहमी उल्लेख करत, अशी आठवण त्यांनी जागवली. त्या म्हणाल्या, जल, जंगल, जमिनीवर आदिवासींचा हक्क आहे. मात्र, देशात २२ लाख वनपट्टे दावे या सरकारच्या काळात फेटाळून लावले गेल्याचा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा…गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मतदान करू नका, आदिवासी विकास परिषदेचा जाहीरनामा
जागरुक, सतर्क रहा
विधानसभा निवडणूक तुमच्या आत्मसन्मानाची आहे. त्यामुळे २० रोजी जागरक व सतर्क राहून मतदानाचा हक्क बजवावा. अर्जुनाप्रमाणे आपले एकच लक्ष्य ठेवा, कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.