बुलढाणा : जागावाटप व उमेदवारीवरून शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये प्रचंड खदखद आहे. बुलढाणा लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे यांनी ही धुसफूस आज जाहीर करीत बंडाचा झेंडा फडकवला. त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करून शिंदे गटाला धक्का दिला आहे. यामुळे दोन्ही मित्रपक्षांतील विसंवाद पुन्हा समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीतही बुलढाणा मतदारसंघ गाजत आहे. पहिल्याच दिवशी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करून अर्ज भरण्याचे संकेत दिले. यापाठोपाठ भाजपचे लोकसभा प्रमुख, माजी आमदार विजयराज शिंदे यांनी रविवारी अर्ज भरण्याचे संकेत दिले. नुसते संकेत देऊन ते थांबले नाही तर त्यांनी आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखलही केला. यामुळे शिंदे गट हादरला असून महायुतीमधील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

कोण आहेत विजयराज शिंदे?

मूळचे शिवसेनेचे असलेल्या विजयराज शिंदे यांनी नगरसेवक, तालुकाप्रमुख ते आमदार, अशी मजल मारली. १९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यावर १९९९ मध्ये ते पराभूत झाले. मात्र यानंतर २००४ व २००९ मधील लढती जिंकून ते पुन्हा आमदार झाले. बुलढाणा मतदारसंघात तीनवेळा आमदार होणारे ते पहिले नेते ठरले. २०१४ मध्ये पराभूत झाल्यावर २०१९ मध्ये पक्षांतर्गत हाडवैरी खासदार प्रतापराव जाधव त्यांच्या उमेदवारीत अडचण ठरले. त्यांच्याऐवजी संजय गायकवाड यांना संधी मिळाली. शिंदे यांनी ती निवडणूक वंचिततर्फे लढवित दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. निकालानंतर ते भाजपवासी झाले. त्यांच्याकडे ‘मिशन-४५’ अंतर्गत बुलढाणा लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. मात्र, आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजपलाही हादरा दिला आहे.

हेही वाचा – आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, नियमबाह्य पद्धतीने निविदा दिल्याचा रोहित पवारांचा आरोप

निवडणूकविषयक महत्त्वाच्या पदावर असलेल्या शिंदेंच्या या बंडाने मतदारसंघातील राजकीय वर्तुळात प्रामुख्याने शिवसेना शिंदे गोटात खळबळ उडाली आहे. युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वीच अर्ज दाखल करून शिंदे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problem in mahayuti in buldhana rebellion of bjp lok sabha chiefs filing of candidature application scm 61 ssb