नागपूर : राज्यभरातील ६० कारागृहांमध्ये कैद्यांच्या माध्यमातून शेती, कापड, प्रक्रिया, उद्योग , व्यवसाय केले जाते. त्यातून कारागृहाला उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये कारागृहातील उद्योगधंद्यांना अखेरची घरघर लागली असून पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी उत्पादन अर्ध्यावर आले आहे. यावर्षी केवळ १४ कोटींचे उत्पादन झाल्याने कारागृह प्रशासनाला आर्थिक फटका बसला आहे. ही माहिती कारागृह विभागाचे अप्पर संचालकाच्या मुख्य कार्यालयातून समोर आली.
महाराष्ट्र कारागृह विभागाला आर्थिक बळ राज्यातील सर्वच कारागृहात असलेल्या शेती, उद्योग, प्रक्रिया, व्यवसायाकडून मिळते. कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांमधील कला व गुणांना वाव देण्यात येत असून राज्यभरातील जवळपास ८० टक्के कैदी काम करतात. त्यातून त्यांना आर्थिक मोबदलासुद्धा मिळतो. सुतारकाम, लोहारकाम, चर्मकला,वेल्डिंग, केमिकल, फॅक्टरी, साबण, दंतमंजन, रंगकाम, कापड उद्योग, पॉवरलूम, कागद कारखाना, विनकाम आणि शिवणकाम इत्यादी कामे करण्यात येतात. अनेक कैद्यांमध्ये शेती कसण्याचे गुण असतात तर काही कैद्यांना उद्योग-व्यवसायाबाबत ज्ञान असते. कैद्यांच्या माध्यमातून राज्यभरातील कारागृहात असलेली शेती आणि उद्योगातून कोट्यवधी रुपयांचे उत्पादन घेण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कारागृहातील उत्पादन घटल्याचे समोर आले आहे. वर्ष २०१९-२० मध्ये २४ कोटी ३८ लाख रुपये उत्पादन घेण्यात आले होते.
कारागृहातील हे सर्वाधिक उत्पादन असून त्यानंतर कारागृहातील उत्पादनाला घरघर लागली. २०२०-२०२१ मध्ये केवळ ९ कोटी ४ लाख रुपयांनी उत्पादन घटले. २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्य कारागृहाचे वार्षिक उत्पादन ११ कोटी ०९ लाख रुपयापर्यंत वाढले. २०२२-२३ या वर्षात १७ कोटी ९४ लाख रुपयांचे उत्पादन घेण्यात आले. त्यानंतर २०२३-२४ या वर्षात १७ कोटी ४७ लाख रुपयांचे उत्पादन घेण्यात आले. त्यानंतर गेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षांत पुन्हा उत्पादन घटले. या वर्षात १४ कोटी ४५ लाख रुपयांपर्यंत उत्पादन घटले. गेल्या काही वर्षांत राज्य कारागृहाचे उत्पादन आणि नफ्यामध्ये घट होत असून उद्योगधंद्यांना उतरती कळा लागली आहे.
का घटले कारागृहाचे उत्पादन?
खुल्या कारागृहात संख्या वाढल्यामुळे कारखाना-उद्योगांमध्ये काम करणारे कुशल कैदी खुल्या कारागृहात पाठविण्यात आले. कारखाना-उद्योगाबाबत कारागृह अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण दिसून येते. कुशल कैद्यांची वाणवा आणि प्रशिक्षणाचा अभाव हे मुख्य कारण कारागृहतील उत्पादन घटण्याचे दिसून येत आहे.
कैद्यांमधील कला-गुणांना वाव देऊन त्यांच्याकडून कला-कुसरीचे काम करुन घेण्यात येते. काहींना कारखान्यातील कामाचे प्रशिक्षण देण्यात येते. सध्या कारागृहातील शेती उत्पादन वाढले असून अन्य उत्पादन वाढीसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. डॉ. जालींदर सुपेकर (विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य कारागृह विभाग)