आंतराष्ट्रीय परिषदेच्या समारोपात प्रा. नील जोन्सन यांचे मत
भारतासह जगात महिलांच्या लग्नाचे वय वाढत आहे. त्यामुळे स्त्री-बिजाशयातील राखीव स्त्री-बीजसाठा कमी होण्याचेही प्रमाण वाढले आहे. या दोन्ही समस्यांमुळे महिलांमध्ये गर्भपात होण्याचे प्रमाण वाढले असून ते येत्या काळाकरिता धोकादायक आहे, असे मत जागतिक स्तराचे तज्ज्ञ प्रा. नील जोन्सन (न्यूझीलंड) यांनी व्यक्त केले. श्रीखंडे हॉस्पिटल व सरोगसी सेंटर आणि फेमिकेअर फाऊंडेशनतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
नुकत्यात झालेल्या कार्यशाळेत प्रा. नील जोन्सन यांनी स्त्री-बिजाशयातील कमकुवत स्त्री-बीज साठय़ाची कारणे तसेच उपचारांवर चर्चा केली. प्रा. अर्नेस्ट एन.जी. यांनी वारंवार होणाऱ्या गर्भपाताशी संबंधित बऱ्याच विषयांवर मार्गदर्शन केले. गेल्या दशकात बदललेल्या जीवनशैलीशी संबंधित विविध घटकांमुळे डिंबग्रंथी सिंड्रोम (पॉलीसिस्टटिक ओव्हॅरियन सिंड्रोम)च्या संख्येत भयानक वाढ झालेली आहे. डॉ. परीक्षित टांक यांनी ‘पी.सी.ओ.एस.’च प्रजोत्पादनावर होणारा परिणाम व त्याचे होणारे दुरगामी परिणाम या दोन्ही विषयांवर सविस्तर चर्चा केली. तसेच वंध्यत्वक्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान व हे तंत्रज्ञान रुग्णांना खरोखरच फायदेशीर आहे की तो फक्त एक भ्रमच आहे, यावर डॉ. कामिनी पटेल (अहमदाबाद) यांनी प्रकाश टाकला.
डॉ. रुमा चक्रवर्ती (दुबई) यांनी द्वितीयक वंध्यत्व हे प्राथमिक वंध्यत्वापेक्षा वेगळे आहे काय? या विषयावर मार्गदर्शन केले. काँग्रेस की नोट्स अंतर्गत प्रा. नील जोन्सन यांनी अनाकलनीय वंध्यत्वाची वर्तमान घटकांवर आधारित उपचारपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. विविध उपचारांच्या वारंवार अपयशानंतर रुग्णांमध्ये पुढील व्यवस्थापन कसे करावे याबद्दल प्रा. अर्नेस्ट एन.जी. यांनी मार्गदर्शन केले. आयएफव्ही उपचारातील यशाचे प्रमाण कसे वाढवावे यावर सॅम्युअल डोंस सॅन्तोस रिबेरिओ हे बोलले, तर डॉ. जयदीप टांक (मुंबई) यांनी सरोगसी व अंडदानाशी संबंधित विविध कायदेशीर व न्यायवैद्यक विषयांवर चर्चा केली. परिषदेचा समारोप प्रश्नोत्तराच्या सत्राने झाला. त्यात उपस्थित डॉक्टरांनी तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांना विविध विषयांवर प्रश्न विचारून समस्यांचे निराकरण केले. डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांनी आलेल्या सगळ्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचे आभार मानले.

Story img Loader