ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधीविरोधी होते. त्यामुळे अशांनी डाॅ. प्रमोद मुनघाटे संपादित पुस्तकातही गांधीविरोधीच लेख लिहिले. गांधींवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या अशा लेखकांकडून गांधींना न्याय कसा मिळेल, असा प्रश्न ज्येष्ठ संपादक लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी केला.
हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?
‘दक्षिणायन महाराष्ट्र’ या संघटनेच्या वतीने साहित्य अकादमीतर्फे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि ‘अभिव्यक्ती आणि वास्तव’ या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. हिस्लॉप महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रा. द्वादशीवार बोलत होते. यावेळी जागतिक कीर्तीचे भाषातज्ज्ञ व विचारवंत डॉ. गणेश देवी, ओबीसी महासंघाचे डॉ. बबनराव तायवाडे उपस्थित होते.
हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
प्रा. द्वादशीवार म्हणाले की, खांडेकरांपासून ते प्र.के. अत्र्यांपर्यंत त्यांनी न्याय कुणाला दिला हे माहिती असतानाही आम्ही त्यांनाच डोक्यावर घेतो. मात्र, आम्हाला गांधी सांगणारे विनोबा भावे, साने गुरुजी हे लेखक नाही तर गांधी विचारांचे केवळ प्रचारक होते, असे सांगितले जाते अशी टीकाही त्यांनी केली. अभिव्यक्तीवर बोलताना ते म्हणाले की, स्वातंत्र्य हा लोकशाहीचा प्राण आहे आणि अभिव्यक्ती हा स्वातंत्र्याच्या मूल्यवर्धनाचा भाग आहे. परंतु आज आपले मत व्यक्त करता येत नसेल तर ही अभिव्यक्ती कसली असा प्रश्नही त्यांनी केला. अभिव्यक्तीवर बंधने ही केवळ राजसत्तेकडूनच नाही तर धर्माकडूनही लावली जातात. कारण धर्म पटवून द्यायला विचार द्यावा लागत नाही. त्यामुळे धर्म, जातीची बंधनेही अभिव्यक्तीसाठी घातक असल्याचे प्रा. द्वादशीवार म्हणाले. यावेळी त्यांनी सध्या न्यायालयेसुद्धा स्वच्छ राहिली नाही अशी टीका केली. न्यायालये सत्तेकडे पाहून न्याय देत आहेत.
हिंदू मताची न्यायालये झाल्याने मालेगाव बॉम्बस्फोटातून सुटणारे आज लोकसभेत जाऊन बसल्याचेही ते म्हणाले. आज लोकशाहीवर आलेले संकट हे केवळ देशावरचे नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीवरचेही आहे.त्यामुळे सर्वांनी संघटित होऊन याविरोधात एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रा. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी ‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य’ या पुस्तकावर भाष्य केले. तर वर्तमान राजकीय व सामाजिक परिस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रश्नांवर डॉ. श्रीनिवास खांदेवाले, डॉ. बबनराव तायवाडे आणि प्रा. रणजीत मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. प्रा. प्रमोद मुनघाटे यांनी संपादनाचा अनुभव मांडला. अरुणा सबाणे यांनी सूत्रसंचालन केले.
हेही वाचा : स्कूलबस चालकाकडून नियमांची पायमल्ली ; नऊ सिटर वाहनात कोंबले ३१ विद्यार्थी, डिक्कीतही…
१०० कोटीं लोकसंख्येचा धर्म धोक्यात कसा?
धर्म धोक्यात आहे असे म्हणणाऱ्यांना आपणच निवडून दिले. मात्र, देशातील १०० कोटी लोकसंख्या ज्या धर्माची आहे तो धर्म धोक्यात कसा, असा प्रश्न करत सत्ता धोक्यात आली तरच धर्म धोक्यात येतो असे प्रा. द्वादशीवार म्हणाले.
अहिंसक मार्गानेच विरोध करावा लागेल : डॉ. देवी
आज स्वातंत्र्य, अभिव्यक्तीवर दडपण आणले जात आहे. त्याचा विरोध हा शिवीगाळ करून होणार नाही. त्यासाठी सखोल विचार करून अहिंसक मार्गानेच विरोध करावा लागेल. बंदुकीच्या गोळीला न घाबरणारे साहसच गोळीला हरवू शकते. त्यामुळे अशा ‘फॅसिजम’च्या विरोधात एकत्र या, असे आवाहन गणेश देवी यांनी केले.