रिक्त जागांचा आलेख चढता
गेल्या चार वर्षांत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्था किंवा महाविद्यालयांची संख्या रोडावत चालली असताना रिक्त जागांचा आकार मात्र वाढत चाललेला आहे. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचा अपवाद वगळता इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी येणाऱ्या विद्यार्थी संख्येचा आलेख घटतच आहे. अभियांत्रिकी करूनही विद्यार्थी पुढे अभियंता होतीलच, याची अजिबातच शाश्वती नाही. कारण अभियांत्रिकी करून मुले स्पर्धा परीक्षा किंवा बँकिंग क्षेत्राकडे वळून कारकून बनणे पसंत करतात. नोकरी एके नोकरी मग ती कुठलीही असो, ती मिळवणे एवढेच ध्येय विद्यार्थ्यांनी ठरवले आहे. त्यामुळे अभ्यासक्रम कोणताही पूर्ण केला तरी त्याच विषयात पुढे उच्च शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी विद्यार्थी धडपड करतीलच असे नाही. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये सर्व अभ्यासक्रम नोकऱ्यांची संधी हमखास उपलब्ध करून देतात. मात्र, त्यातही विद्यार्थी जास्त आणि नोकऱ्या कमी किंवा पदाला लायक उमेदवार न मिळणे या समस्यांना कंपन्यांना तोंड द्यावे लागते. मात्र यावर्षी तर अकरावी व बारावी करून नंतर पुढे कोणत्याही शाखेला प्रवेश घेणे असा अविचारी निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाच्या जागाही मोठय़ा संख्येने रिक्त आहेत.
गेल्या तीन चार वर्षांची आकडेवारी पाहिल्यास विद्यार्थीच मिळत नसल्याने महाविद्यालये बंद करण्यासाठी महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाचा खटाटोप सुरू आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये किंवा संस्था दरवर्षी एक-दोन वजा होताना दिसत आहेत. अर्थात प्रवेश क्षमताही दरवर्षीच वाढत गेली, हेही महत्त्वाचे. वर्ष २०१२-१३ मध्ये पदवी अभियांत्रिकीच्या (बीई) ५८ संस्था होत्या. पुढील वर्षी एक कमी झाली. यावर्षी आणखी एक म्हणजे ५६ संस्था आहेत. मात्र रिक्त जागांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. २०१२-१३ मध्ये ६,७१० रिक्त जागा होत्या. त्याच्या पुढच्यावर्षी ८,२४०, गेल्यावर्षी ११ हजार ८३१ आणि यावर्षी रिक्त जागा १०,८९८ आहेत. पदव्युत्तर कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) अभ्यासक्रमाचीही तीच अवस्था आहे. २०१२-१३ मध्ये २१ संस्था होत्या.
गेल्यावर्षी २१ आणि १७ आहेत. मात्र, रिक्त जागांची संख्या झपाटय़ाने वाढलेली आहे. २०१२-१३ मध्ये २७२ जागा रिक्त होत्या. गेल्यावर्षी १३७४ जागा रिक्त राहिल्या तर यावर्षी प्रवेश क्षमता कमी असल्याने ९०५ पैकी केवळ ४३६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.
अभियांत्रिकीच्या पाठोपाठ सर्वात जास्त महाविद्यालये, प्रवेश क्षमता आणि रोजगार मोठय़ा प्रमाणात मिळणारा अभ्यासक्रम म्हणून पदव्युत्तर व्यवसाय व्यवस्थापन (एमबीए) अभ्यासक्रमाकडे पाहिले जाते. २०१२-१३ मध्ये ‘एमबीए’च्या अभियांत्रिकीपेक्षा जास्त म्हणजे ५९ संस्था होत्या. गेल्यावर्षी ५८ आणि यावर्षी एकदम ५० वर एमबीए महाविद्यालये आली असून, एकूण आठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशच नसल्याचे तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. बी.फार्म. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे. बी.फार्मची १७ महाविद्यालये आहेत. नागपूर विभागात ९३० पैकी केवळ ६९ जागा रिक्त आहेत. तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त जागा रिक्त आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा